Goa : राज्यात व्यावसायिकतेसाठी वापर करण्यात आलेल्या तीन हत्तींपैकी जानीमानी या हत्तीची रवानगी कर्नाटकमध्ये करण्यात आली आहे. उर्वरित दोन हत्तींसाठी आवश्यक असलेली वन खात्याची परवानगी मिळताच त्यांची जमनानगर (गुजरात) येथे रवानगी केली जाईल अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने त्याचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी 10 ऑक्टोबर 2022 रोजी ठेवली आहे.
गोवा वन खाते व वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्राच्या (डब्ल्यूआरआरसी) संयुक्त समन्वयाने जानीमानी हत्तीची कर्नाटक येथील हत्ती निगा सुविधा केंद्राकडे रवानगी कऱण्यात आली आहे. उर्वरित ‘बाबू’ व ‘मानिक या दोन हत्तींचीही रवानगी करण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. त्यांना जमनानगर (गुजरात) येथील राधाकृष्ण मंहित, हत्ती कल्याण ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या ठिकाणी हत्तींच्या पालनपोषणासाठी तसेच त्यांच्यावरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणात जागा आहे व निगा केंद्रही आहे. तेथे स्थलांतर केल्या हत्ती सुरक्षित राहू शकतील अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली. या दोन्ही हत्तीच्या मालकांनी त्यांचे गुजरातला स्थलांतर करण्यास सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
या हत्तींची रवानगी करण्यास किमान महिन्याचा अवधी लागेल कारण स्थलांतर करण्यासाठी गुजरात वन खात्याची परवानगी लागणार असून त्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. ही परवानगी मिळाल्यावर फोंडा प्रथमश्रेणी न्यायालयात या हस्तींच्या गैरवापराबाबत सुरू असलेल्या खटल्यात न्यायालयाकडून या हत्तींचे स्थलांतर करण्यास परवानगी गरज लागणार आहे,
व्यावसायिक वापरावर बंदी
हत्तींचा व्यावसायिकतेसाठी वापर करणे कायद्यानुसार बंदी असताना राज्यात त्याचा वापर करून उल्लंघन केले जात आहे. या हत्तींच्या पालनपोषणावर तसेच उपचारावर खर्च केला जात नसल्याने त्यांची सुरक्षा बिकट झाली आहे.या हत्तींचा गैरवापर पर्यटकांना घेऊन सफारी करण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे या हत्तींची सुरक्षित स्थळी वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्रात रवानगी केली जावी अशी विनंती याचिकादाराने केली होती. याचिकादारतर्फे ॲड. नॉर्मा आल्वारिस बाजू मांडत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.