Goa Tsunami False Alert:
तारीख- बुधवार, 6 सप्टेंबर 2023. स्थळ- पर्वरी, गोवा. वेळ- रात्री 8 वाजून 40 मिनिटांची.
अचानक एक सायरन वाजू लागला, आणि गोव्यातील सरकारी यंत्रणेची अक्षरशः धांदल उडाली. कारण, हा साधासुधा सायरन नव्हता. तर चक्क त्सुनामी येत असल्याचा इशारा देणारा सायरन होता...
राज्याच्या जलस्त्रोत मंत्रालयाच्या (WRD) च्या अर्ली वॉर्निंग डिसमिनेशन सिस्टीमने गोव्याच्या किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा देणारा अलार्म जारी केला होता.
तथापि, पर्वरी अग्निशमन केंद्राजवळील अर्ली वॉर्निंग डिसमिनेशन टॉवर तांत्रिक बिघाडामुळे खराब झाल्यामुळे हा सायरन वाजू लागला होता. आपत्ती व्यवस्थापन केंद्रातील बिघाडामुळे हे झाल्याचे संबंधित विभागाने ताबडतोब स्पष्टही केले.
रात्री 8:40 च्या सुमारास जेव्हा टॉवरवरून त्सुनामीचा इशारा मिळू लागला. आणि बघता बघता अलार्मचा व्हिडिओ किनारपट्टी भागात वणव्यासारखा पसरला. त्यामुळे किनारपट्टीवरील रहिवासी आणि मच्छिमारांमध्ये चिंता निर्माण झाली. आजूबाजूच्या परिसरातील शेकडो लोकांमध्ये भीती निर्माण झाली.
पर्वरीत अनेक लोकांमध्ये घबराट पसरली होती. 10 मिनिटांच्या अंतराने सायरन वाजला. पर्वरीतील अनेक लोक घरातून बाहेर पडून, गाड्या थांबवून अलार्म कशाचा आहे, याची माहिती घेत होते.
तथापि, उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी मामू हागे यांनी, यंत्रणेत बिघाड झाला असून त्सुनामी आलेली नाही, चुकून सायरन वाजल्याचे स्पष्ट केले. मामू हागे म्हणाल्या की, ही कोणत्याही प्रकारची ड्रिल नव्हती.
मी हवामान विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) कडून खात्री करून घेतली. त्सुनामी नाही. पर्वरीतील इशारा टॉवरने असा अलार्म दिल्यावर जलस्त्रोत मंत्रालयालाही या पाठीमागचे कारण शोधण्यास सांगितले आहे.
नॅशनल सायक्लोन रिस्क मिटिगेशन प्रोजेक्ट अंतर्गत गोव्यात पूर्व इशारा प्रसार प्रणाली सेटअपचा भाग म्हणून जलस्त्रोत मंत्रालयाने गोव्यात अनेक ब्रॉडकास्ट टॉवर्स उभारले आहेत.
इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) कडून सुनामीचा असा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन उत्तर गोवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने देखील केले.
विशेष म्हणजे, त्सुनामी अलर्टची ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट ब्रिटनमध्ये देखील पोहचली. त्यामुळे गोव्यातील परदेशी पर्यटकांनाही त्यांच्या आप्तांकडून परदेशातून चौकशीचे फोन आल्याची माहिती आहे.
त्सुनामी म्हणजे काय?
त्सुनामी हा जपानी शब्द असून 'त्सु' चा अर्थ बंदर आणि 'नामी' याचा अर्थ लाटा असा आहे. बंदरात आलेल्या समुद्री लाटा असा त्याचा अर्थ होतो. अजस्त्र लाटांसाठी हा शब्द वापरला जातो. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का कोसळून समुद्रातील पाणी वेगाने स्थानंतरीत होते.
यातून निर्माण झालेल्या लाटांची मालिका म्हणजे त्सुनामी. या लाटांची लांबी, उंची आणि वेग जास्त असतो.
भारतात 2004 साली बसलेला त्सुनामीचा तडाखा
2004 मध्ये हिंदी महासागरात त्सुनामी आली होती. 26 डिसेंबर 2004 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुमात्रा बेटाजवळील समुद्रामध्ये 9.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्यातून त्सुनामी लाटा उद्भवल्या.
या त्सुनामीचा फटका इंडोनशिया, थायलंड, भारत, म्यानमार, मादागास्कर, श्रीलंका या देशांना बसला होता. नैसर्गिक आपत्तीच्या इतिहासात ही सर्वांत भयानक नुकसानकारक त्सुनामी ठरली. यात सुमारे 2,27,988 लोकांचा बळी गेला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.