
Tripurari Poornima 2023 : साखळी, त्रिपुरारी पौर्णिमेच्या लख्ख चांदण्यात विठ्ठलापूर-साखळीच्या वाळवंटी नदीत विहरणाऱ्या एकापेक्षा एक अशा आकर्षक नौकांनी वाळवंटीचे पात्र अगदी खुलून गेले होते.
नदीपात्रातील रंगमंचावर दशावतारी कलाकारांकडून ‘त्रिपुरासुराचा वध’ भाग सादर झाल्यानंतर त्रिपुरासुराच्या प्रतिकृतीचा बाण मारून झालेला वध व त्यानंतर करण्यात आलेली दारूकामाची आतषबाजी डोळे दीपवून घेणारी होती.
तत्पूर्वी वाळवंटी पात्रात सुवासिनींकडून सोडण्यात आलेल्या दिव्यांमुळे पाण्यात वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. अशाप्रकारे रविवार, २६ रोजी हा भव्यदिव्य असा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कला व संस्कृती खाते, पर्यटन विकास महामंडळ, दीपावली उत्सव समिती विठ्ठलापूर-साखळी व विठ्ठल रखुमाई देवस्थान समिती या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठलापूर-साखळी येथे आयोजित राज्यस्तरीय त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव व नौकानयन सोहळा लक्षवेधी ठरला. एकूण २५ नौका या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्याम गावकर, समृद्धी गणपुले यांनी केले.
सोहळ्याला हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. या सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार प्रेमेंद्र शेट, सरपंच दत्तप्रसाद खारकांडे, नगराध्यक्ष रश्मी देसाई, संचालक सगुण वेळीप, दीपावली उत्सव समितीचे अध्यक्ष दिनेश उसपकर, देवस्थानचे अध्यक्ष राणे व इतरांची उपस्थिती होती.
सरंगे’ उडाले आकाशी
रविवारी रात्री ८ वा.पासून विठ्ठल रखुमाई मंदिराच्या परिसरात नौकानयन स्पर्धेतील नौका दखल झाल्या होत्या. मंदिराच्या बाजूला उभारण्यात आलेल्या रंगमंचावर ‘नटरंग उभा’ हा खास संगीताचा कार्यक्रम झाला. रात्री त्रिपुरासुराचा वध झाल्यानंतर वाळवंटीच्या पात्रात आकर्षक नौकांचा विहार सुरू झाला. यावेळी सोहळ्यात आकर्षक ‘सरंगे’ आकाशाच्या दिशेने झेप घेत होते.
‘विकास प्रकल्पां’चे प्रदर्शन
राज्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली साकारण्यात आलेल्या विविध ४० विकास प्रकल्पांचे फोटो प्रदर्शन मंदिराच्या बाजूला लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनीही या प्रदर्शनाचा आस्वाद घेतला.
‘वाळवंटी’साठी पुढे या :
ज्या वाळवटी नदीत ही नौकानयन स्पर्धा होत आहे. त्या वाळवंटीचे अस्तित्व सांभाळणे आमचीच जबाबदारी आहे. वाळवंटी नदीचे सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने सरकार पावले उचलत आहे. येणाऱ्या काळात या नदीचा परिसर सुशोभीत केला जाणार आहे.
नदीतील पाणी प्रदूषित होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.