मडगाव आणि फातोर्डा परिसरातील ३१ बेवारस वाहनांची नोंद वाहतूक पोलिसांनी केलेली आहे. या वाहनांवर सहा महिन्यांमध्ये कुणीही हक्क न सांगितल्यास लिलाव केला जाईल. यासंदर्भात दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटीस जारी करण्यात आलेली आहे.
दक्षिण गोवा (South Goa) जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांनी जारी केलेल्या नोटिशीत म्हटले आहे,की बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.
दक्षिण गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी मडगाव आणि फातोर्डा परिसरात दीर्घ काळापासून बंद अवस्थेत व बेवारस स्थितीत असलेल्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केली आहे.
या बेवारस वाहनांमुळे डासांची पैदास होऊन साथीचे रोग पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे सामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या बेवारस वाहनांमुळे जनतेची व वाहतुकीला गैरसोय होत आहे.
काही ठिकाणी पार्किंगच्या जागा अनायासे अडवल्या गेलेल्या आहेत. या वाहनांमुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.
या बेवारस वाहनांवर हक्क सांगितला न गेल्यास लिलाव केला जाणार आहे. या वाहनांवर कुणाचा हक्क किंवा दावा असल्यास त्यांनी सहा महिन्यांच्या आत कागदोपत्री पुराव्यासह उपजिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
सहा महिन्यांनंतर कोणत्याही प्रकारचा दावा मान्य केला जाणार नाही. ही वाहने राज्य सरकारच्या नावे जप्त करून लिलावाद्वारे निकाली काढली जातील. वाहतूक विभागाने नोंद केलेल्या ३१ वाहनांची यादी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे असल्याचेही सांगण्यात आले.
फातोर्डा परिसरात रस्त्यावर बेकायदेशीर पार्क करुन ठेवणार्या वाहनांच्या विरोधात आज मडगाव वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरु केली असून ही मोहीम संपूर्ण मतदारसंघात राबविली जाईल अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी दिली.
रवींद्र भवन सर्कल ते आर्लेम सर्कल पर्यंतच्या रस्त्यावर बेशिस्त पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. काल आमदार विजय सरदेसाई यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या बेशिस्त पार्किंग विरूद्ध कारवाईचे निर्देेश दिले होते. त्यानंतर लगेच ही कारवाई सुरू झाली आहे.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ (हॉस्पिसियो) येथे महामार्गापासून ४० मीटर अंतरावर टी जंक्शनवरील मदर मारिया क्लारा रोडच्या दिशेने वाहनतळ निश्चित केला आहे. इस्पितळाच्या संरक्षक भिंतीच्या बाजूने रिक्षा, टॅक्सी स्टँड आणि मोटारसायकल पायलट स्टँडची होणार आहे.
शेवटचा वाहनतळ हा रुग्ण, नातेवाईक व इतर इस्पितळात येणाऱ्यांना राखीव असेल. जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांनी अधिसूचना जारी केली आहे. साबांखा कार्यकारी अभियंता यांना फलकांची उभारणी करण्यास सांगितलेले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.