शहरी बाजारपेठा पडताहेत ओस!

टाळेबंदीचा परिणाम : राज्‍यभर व्यापाराचे विकेंद्रीकरण
City Market
City Market Dainik gomantak

पणजी : कोविड महामारीच्या काळात सरकारने टाळेबंदी लागू केल्यापासून गेल्या अडीच-तीन वर्षांत ग्रामीण भागात तसेच शहरांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांलगत अनेक दुकाने उभी राहिल्याने गावांतच खरेदी करणे लोकांच्याही अंगवळणी पडले आहे. परिणामी शहरी बाजारपेठा आता ओस पडू लागल्या आहेत, असे शहरी व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ( Trade in urban markets slowed )

सुरुवातीस सरकारने कोविडचे कारण पुढे करून बाजारपेठाच बंद केल्याने गावातच खरेदी करण्याची सवय ग्रामीण भागातील लोकांना झाली. त्यामुळे खरेदीसाठी शहरी भागात जाऊन उगाच वेळ आणि पैसा का खर्ची घालायचा, असा विचार ही मंडळी करू लागली आहे. ज्या वस्तू ग्रामीण भागात मिळू शकत नाहीत, अशाच वस्तूंच्या खरेदीसाठी लोक शहरांत जातात. टाळेबंदीमुळेच लोकांच्या मानसिकतेत बदल होऊन गोवाभर व्यापार-उदिमाचे विकेंद्रीकरण झपाट्याने झाले आहे.

टाळेबंदीपूर्वी शहरांतील मोठ्या तसेच मोजक्या संख्येने विक्रेत्यांना चांगल्यापैकी नफा व्हायचा. पण, आता त्यापैकी छोट्या विक्रेत्यांनी ग्रामीण भागांत रस्त्यांच्या कडेला व्यवसाय उभारले आहेत. तसेच, काही नवीन विक्रेतेही या व्यवसायात आले आहे. त्यामुळे, नव्याने रोजगारनिर्मिती झाली आहे व दुसऱ्या बाजूने शहरांतील विक्रेत्यांच्या आर्थिक उत्पन्नात घट झालेली आहे.

City Market
लोबोंसह काँग्रेसचे 6 आमदार लवकरच होणार भाजपवासी!

मासेविक्रेतेही आता दारात

पूर्वी गोव्यातील कित्येक कुटुंबांतील लोक दररोज मासळी विकत घेण्यासाठी शहरातील बाजारपेठेत जायचे. पण, त्यापैकी बहुतांश जणांनी शहरातील मासळी मार्केटमध्ये जाण्याचेच बंद केले आहे. याचे अन्य कारण म्हणजे दुचाकींच्या साहाय्याने मासळीविक्री करणाऱ्या व्यक्ती गावोगावी फिरत आहेत. त्याशिवाय, काही गावांत मोक्याच्या ठिकाणी चार-चाकी वाहनांच्या साहाय्याने मासळीविक्री करणारे नवीन व्यवसायिक सध्या कार्यरत आहेत.

सोपो करात सवलत फायद्याची

काही गावांतील स्थानिक पंचायती संबंधित विक्रेत्यांना सोपो करातही अप्रत्यक्षरीत्या सूट देत आहेत. तसेच, शहरी भागातील सोपो करापेक्षा ग्रामीण भागातील सोपो कराचे प्रमाण निश्चितच कमी आहे. सर्व विक्रेते स्थानिक अथवा परिचयाचे असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी ते धोरण अवलंबले असू शकते. मालाची शहरापर्यत ने-आण करण्यासाठी विक्रेत्यांना करावा लागणारा खर्चही कमी झालेला आहे.

या कारणांमुळे बाजारपेठांवर परिणाम...

1. शहरांमध्ये जाणवते वाहन पार्किंगची समस्या.

2. गावोगावी नव्याने झालेले छोटेखानी सुपरमॉल्स.

3. उपनगरी भागांत उभारण्यात आलेले मॉल्स.

4. प्रवास-वाहतूक खर्चात ग्राहक-विक्रेत्यांचीही बचत.

5. गावोगावी फिरणारे मासळी, भाजी विक्रेते.

6. टाळेबंदीमुळे नोकऱ्या गमावलेल्यांनी ग्रामीण भागांत थाटला व्यवसाय.

7. कोविडमुळे ग्रामीण भागांकडे वळलेले विक्रेते.

City Market
Photo : गोव्यात मान्सूनपूर्व शेतीच्या कामांना गती

-ग्रामीण भागात समांतर अर्थव्यवस्था

टाळेबंदीच्या वेळी शहरी भागांत लोकांचे जाणे-येणे खूपच कमी झाले होते. सुरुवातीला बाजारपेठा पूर्णत: बंद होत्या. त्यानंतर बाजारपेठांतील दुकाने टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू केली तरी ग्राहकच नाहीत, अशी स्थिती शहरांमध्ये निर्माण झाली. ती स्थिती अजूनही बऱ्याच प्रमाणात कायम आहे. याचे कारण म्हणजे आता शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागांतही समांतर अर्थव्यवस्था मजबूत होत आहे.

कोविडमुळे दोन-अडीच वर्षे म्हापसा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची खूपच गोची झाली. सुरुवातीला लोक बाजारपेठेत यायचे टाळत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. काही विक्रेत्यांनी थेट ग्रामीण भागांत व्यवसाय थाटल्याने संबंधित भागांतील ग्राहक तिकडेच वळलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. म्हापसा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची परिस्थिती पूर्वपदावर येण्यास वेळ लागेल. सध्या त्यात पन्नास-साठ टक्के प्रमाणात सुधारणा झाली आहे. - श्रीपाद सावंत, अध्यक्ष, म्हापसा व्यापारी संघटना

कोविडमुळे गोव्यातील मोठ्या बाजारपेठांवर बराच परिणाम झाला आहे. सध्या ही स्थिती धिम्या गतीने पूर्वपदावर येत आहे. टाळेबंदीमुळे गावोगावी नव्याने सुरू झालेल्या दुकानांतून तसेच रस्त्यांवरील स्टॉल्समधून खरेदी करण्याचे लोकांच्या अंगवळणी पडले आहे. म्हापसा बाजारपेठेतीलही व्यापारी उलाढाल अजूनही पूर्वीप्रमाणे शंभर टक्क्यांवर पोहोचलेली नाही. म्हापसा बाजारपेठेतील पार्किंग, शौचालय, फिरत्या विक्रेत्यांची गर्दी यांचा परिणामही व्यापाऱ्यांच्या उलाढालीवर झाला आहे.- सिद्धेश राऊत, सचिव, म्हापसा व्यापारी संघटना.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com