मडगाव: पॅरिसमध्ये पर्यटक आयफेल टॉवर पाहायला जातात त्याच प्रमाणे यापुढे गोव्यात झुवारी पुलावरील मनोरा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतील अशी अपेक्षा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
झुवारी पुलावरील या नियोजित व्यूव्हर्स गॅलरी प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरवात केली जाणार असल्याची माहिती त्यांनी आज लोटली - वेर्णा मिसिंग लिंक या 184 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या रस्त्याचे उद्धाटन करण्यासाठी आले असता दिली. हा प्रकल्प 'स्टेट ऑफ द आर्ट' अशा तरेचा असेल. ज्यावर शॉपिंग मॉलही उभारले जाणार असून गोव्यातील पारंपरिक हातमाग, हस्तकला, खाद्यपदार्थ यासारख्या वस्तू विकण्याची स्टॉल्स तिथे उभारली जातील असे त्यांनी सांगितले. या कामाची निविदा जारी करूनच मी गोव्यातून बाहेर पडेन असेही त्यांनी सांगितले.
गोव्याला आजवर एका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खात्यातूनच 12 हजार कोटींची कामे झाली आहेत. आणखी 11 हजार कोटींची कामे मार्गी लागण्याच्या वाटेवर आहेत. ज्यात मुंबई - गोवा चौपदरी महामार्ग कर्नाटक राज्यापर्यंत पोहोचविण्याच्या कामाचा समावेश आहे. हा सर्व खर्च करताना गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र आहे हे आम्ही नजरेसमोर ठेवले आहे असे त्यांनी सांगितले.
दरम्यान समांतर झुवारी पुलाचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून या तीन पुलांपैकी एक पूल डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार असा विश्वास सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी सांगितले. तीन पॅकेजमध्ये हे काम चालू आहे. पहिल्या पॅकेजमध्ये 820 कोटी रुपये खर्चून पूल बांधला जात असिन त्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. झुवारीचा दुसरा पूल दुसऱ्या पॅकेज मध्ये पूर्ण होत असून त्याचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. झुवारी पूल ते वेर्णा या मार्गाचे काम तिसऱ्या पॅकेजमध्ये होत असून हेही काम 90 टक्के पूर्ण झाले असून 2022 पर्यंत हे सर्व काम पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.