
Traditional music and dance on Goa cruises
पणजी: गोवा राज्याच्या सांस्कृतिक वारशामध्ये पारंपरिक नृत्य, लोकगीते, दृश्यकला, संगीताचा समावेश आहे. ग्रामीण भागात अजूनही पारंपरिक संगीत आणि नृत्याच्या स्वरूपाचा हा वारसा जपून ठेवला आहे. त्याचा आणखी प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी क्रुझवर येणाऱ्या पर्यटकांनाही आता या वारशाचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
धालो, फुगडी, मांडो आदी लोकनृत्यांनी गोव्याच्या सीमारेषा ओलांडून संपूर्ण देशात लोकप्रियता मिळविली आहे. तसेच गोव्याची खाद्यसंस्कृतीही महत्त्वाचा ठेवा असून ती विविध चवींची अनुभूती देते. याचाच विचार करून सरकारने मांडवी नदीतील तसेच इतर भागांतील क्रुझवर गोव्याचा सांस्कृतिक वारसा आणि खाद्यसंस्कृतीचे प्रदर्शन करण्याचे ठरविले आहे.
गोवा सरकारच्या या पुढाकारामुळे स्थानिकांना प्रोत्साहन मिळेल आणि गोव्याचा सांस्कृतिक वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान उपरोक्त प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडून त्यास संमती घेण्यात येणार आहे.
राज्य सरकार गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार आणि प्रसार देशी-विदेशी पर्यटकांमध्ये करण्यास प्रयत्नशील आहे. त्यामुळे गोव्याची कला, संगीत आणि खाद्यसंस्कृतीला नवीन उंची देखील प्राप्त होईल. शिवाय स्थानिक कलावंतांना आपले कौशल्य सादर करण्याची आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील.
राज्यातील सर्व पर्यटन क्रुझ बोटमालकांना दररोज एक तास पर्यटकांना गोव्याची संस्कृती व वारशाचे दर्शन घडविण्याची सूचना सरकारने केली आहे. त्यात पारंपरिक संगीत, लोकगीते, लोकनृत्ये आणि गोमंतकीय खाद्यपदार्थांचा समावेश आहे. मात्र, ही अट खासगी चार्टर क्रुझ किंवा खासगी पार्ट्यांसाठी आयोजित क्रुझवर लागू असणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.