
मडगाव: यापूर्वी गोव्यात मसाज पार्लरच्या माध्यमातून युवतींना वेश्या व्यवसायात ढकलण्याचे काम चालायचे. मात्र आता गोव्यातील वाढते पर्यटन हे या युवतींना मानवी तस्करीच्या जाळ्यात ओढण्याचे मुख्य साधन बनले आहे. गोव्यातील वेगवेगळी पब्स आणि रेस्टॉरंटस्मध्ये काम देण्याच्या बहाण्याने विदेशातील युवतींना गोव्यात आणले जात असून नंतर त्यांना वेश्या व्यवसायात लोटले जाते, अशी माहिती पुढे आली आहे.
मानवी तस्करी प्रकरणातील बळींचे पुनर्वसन करण्यासाठी वावरणाऱ्या अर्ज या संघटनेने जो अहवाल तयार केला आहे त्यातून ही माहिती पुढे आली आहे. २०१९ ते २०२४ या पाच वर्षांतील गोव्यातील मानवी तस्करीचा या संस्थेने जो अभ्यास केला आहे त्यात नेपाळ, केनिया, युगांडा यासह बांगलादेश आणि रशियातील युवतींना गोव्यात आदरातिथ्य व्यवसायात काम देण्याच्या बहाण्याने आणले जाते आणि नंतर त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जाते ही बाब पुढे आली आहे.
२०१९ ते २०२४ या दरम्यान गोव्यातील वेश्या व्यवसायाच्या बळी असलेल्या १७२ युवतींची गोवा पोलिसांनी सुटका केली होती त्यातील १३८ युवती भारतीय होत्या. त्या पाठोपाठ नेपाळ आणि बांगलादेश या देशातून आणलेल्या प्रत्येकी १० युवती होत्या. केनियातील आठ, युगाडांतील दोन तर भूतान, किग्रिस्तान, तुर्केमिनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशातील प्रत्येकी एका युवतीचा समावेश होता.
अर्जच्या उपसंचालक ज्युलियाना लोहार यांना यासंदर्भात विचारले असता त्या म्हणाल्या, आम्ही जो अहवाल तयार केला आहे तो फक्त ज्या युवतींची पोलिसांनी सुटका केली त्यावर आधारित आहे. मात्र प्रत्यक्षातील आकडा याहून बराच मोठा असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
वेश्या व्यवसायातून सुटका केलेल्या नेपाळच्या युवतींबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या, नेपाळात हॉटेलमध्ये कित्येक युवती गाणी म्हणण्याचे काम करतात. मात्र तिथे त्या वेश्या व्यवसायात नसतात. अशाच गाणी म्हणणाऱ्या काही युवतींना गोव्यात याप्रकारचे काम करायचे आहे असे सांगून त्यासाठी तुम्हांला अधिक पगार मिळणार असे आश्वासन देऊन गोव्यात आणले होते. मात्र गोव्यात आल्यावर त्यांना वेश्या व्यवसायात जुंपण्यात आले.
काही महिन्यांपूर्वी केनिया आणि युगांडा येथून युवतींना गोव्यात आणून वेश्या व्यवसायात जुंपण्याचे रॅकेट उघडकीस आले होते. याही युवतींना गोव्यातील तारांकित हॉटेल्समध्ये वेट्रेसिस म्हणून काम देण्याच्या बहाण्याने आणले होते. पण प्रत्यक्षात त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले होते.
देशातील प्रमाण पहाता, गोव्यात होणाऱ्या मानवी तस्करीच्या सर्वांधिक बळी या महाराष्ट्रातील युवती असल्याचे दिसून आले असून मागच्या पाच वर्षात ज्या युवतींची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली त्यातील ५० युवती महाराष्ट्रातील होत्या.
त्यापाठोपाठ प. बंगाल (२०) आणि दिल्ली (१५) या राज्यातील युवतींचा समावेश होता. गोव्यासाठी नवीन बाब म्हणजे, उत्तर प्रदेश (१५), छत्तीसगड व पंजाब (प्रत्येकी ६) आणि गुजरात (४) येथील युवतींचीही गोव्यात तस्करी करण्यात आली असून यापूर्वी या राज्यातील युवती गोव्यातील वेश्या व्यवसायात कधी आढळून आल्या नव्हत्या.
या अहवालातून आणखी एक बाब पुढे आली ती म्हणजे, ज्या युवतींची या व्यवसायातून सुटका करण्यात आली त्यापैकी ४९.४१ टक्के युवती १८ ते २५ या वयोगटातील होत्या तर ४१.८६ टक्के युवती या २६ ते ३५ या वयोगटातील होत्या. आकडेवारी पाहिल्यास ही संख्या अनुक्रमे ८५ व ७२ एवढी होती. १८ वर्षाखालील चार युवतींचा तर ३५ वर्षावरील ११ युवतींची या व्यवसायातून सुटका करण्यात आली होती.
उद्या पाळल्या जाणाऱ्या जागतिक मानवी तस्करी दिवसाच्या निमित्ताने काणकोण रवींद्र भवनात आयोजित केलेल्या बहुभाषिक नाट्योत्सवात उद्या ३० जुलै रोजी एकेकाळी गोव्यातील बायणात चालू असलेल्या वेश्या व्यवसायावर आधारित असलेले ‘बायणा का आयना’ हे मराठी नाटक सादर केले जाणार आहे. महेश सावंत पटेल यांनी लिहून दिग्दर्शित केलेले हे नाटक बायणातील वेश्या व्यवसायातील पिडितांवर आधारित असून सायंकाळी ७ वाजता या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे.
अर्ज या संघटनेने जो अहवाल तयार केला आहे त्याप्रमाणे गोव्यातून ज्या युवतींची २०१९ ते २०२४ या कालावधीत सुटका करण्यात आली त्यापैकी ११२ युवतींना अनोळख्या व्यक्तींकडून या व्यवसायात लोटले गेले. ही टक्केवारी ६६ टक्के एवढी मोठी आहे. त्यानंतर ४८ युवतींना मित्रांकडून (२९ टक्के), ५ युवतींना सहकाऱ्यांकडून (३ टक्के) तर ४ युवतींना त्यांच्या पतींनीच (२ टक्के) या व्यवसायात लोटले होते. या अनोळख्या व्यक्तीमध्ये मित्रांचे मित्र, शेजाऱ्यांचे नातेवाईक अशा व्यक्तींचा समावेश दिसून आला अशी माहिती ज्युलियाना लोहार यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.