

म्हापसा: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटीच्या निषेधार्थ म्हापशात शनिवारी तीव्र निदर्शने करण्यात आली. ‘टुगेदर फॉर म्हापसा’ या संघटनेच्या वतीने हुतात्मा चौकात एकत्र येऊन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी केंद्र सरकारवर कडक शब्दांत टीका करण्यात आली. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या हकालपट्टीची मागणीही यावेळी करण्यात आली.
‘नीट’ परीक्षा पेपरफुटीमुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे प्रचंड मानसिक व शैक्षणिक नुकसान झाले आहे. याचा मोठा फटका गोव्यातील विद्यार्थ्यांनाही बसला आहे, असे संघटनेचे अध्यक्ष ॲड. महेश राणे यांनी सांगितले. जितेश कामत यांनी परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा ढिसाळ कारभार व शिक्षण मंत्रालयाचे अपयश यामुळेच देशातील सर्वांत मोठी परीक्षा धोक्यात आली आहे, असा दावा केला.
विजय भिके यांनी या पेपरफुटीच्या धसक्यामुळे देशातील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आपला जीव दिला असल्याचे सांगितले. या घटना म्हणजे आत्महत्या नसून सरकारकडून झालेले खून आहेत आणि याला सर्वस्वी सरकार व शिक्षणमंत्रीच जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला. यावेळी सुदेश असोटीकर, राजेश मराठे, राहुल म्हाब्रे यांच्यासह अन्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
गावसावाडो, म्हापसा येथील एका २२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. यावर भाष्य करताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला धारेवर धरले. या दुर्दैवी मृत्यूसाठी म्हापसा पालिकेचा भोंगळ कारभार तसेच सरकार व पोलिस प्रशासनाची अनास्थाच पूर्णपणे जबाबदार असल्याचा थेट आरोपही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.