Pratapsinh Rane: समाजमनावरील गारुड कायम ठेवणारे 'प्रतापसिंह राणे'

Pratapsinh Rane: बहुआयामी गोव्याचे 18 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले, राज्याच्या पायाभूत, औद्योगिक, शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते माननीय प्रतापसिंह राणे यांचा आज 85 वा वाढदिवस आहे.
Pratapsinh Rane
Pratapsinh RaneDainik Gomantak

Pratapsinh Rane: बहुआयामी गोव्याचे 18 वर्षे मुख्यमंत्री राहिलेले, राज्याच्या पायाभूत, औद्योगिक, शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते माननीय प्रतापसिंह राणे यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. शिस्तप्रिय, निष्कलंक, रसिक, क्रीडाप्रेमी साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने गोव्याच्या राजकीय इतिहासात एक मापदंड निर्माण केला आहे.

Pratapsinh Rane
Goa Road: रस्त्यासाठी हटविले सांतिनेजमधील अतिक्रमण

उत्साहाचा सळसळता झरा असणाऱ्या साहेबांनी लाखो लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला आहे. आजही या वयात साहेब सक्रिय असून सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होतात. लोकांमध्ये सहजपणे मिसळणे व त्यांच्याशी एकरूप होणे हा साहेबांचा स्थायीभाव आहे. त्यामुळेच प्रत्येक वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कुळण-साखळी येथे प्रचंड संख्येने गर्दी करून लोक त्यांच्यावरील आपले उत्कट प्रेम व्यक्त करत असतात. असे प्रेम क्वचितच कुणाच्या वाट्याला येत असते.

डण्यापासून काणकोणपर्यंत ज्यांना प्रत्येक गावात ओळखले जाते असा मान एखाद्या राजकारणाच्या वाटेला येतो. अशा कर्तृत्ववान राजकारणांच्या यादीत माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. ते भले आज राजकारणात सक्रिय नसतील. मात्र, ते समाजजीवनाच्या पटलावरून विरून गेले असे झालेले नाही.

ते राजकारणात आले त्यावेळी या प्रदेशावर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची अमर्याद अशी सत्ता होती. १९७२ मध्ये ते याच पक्षाकडून पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश करते झाले आणि तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. पुढे ते भले काँग्रेसवासी झाले असले तरी त्यांचे मूळ विचार कायम होते. सरकार घेत असलेल्या निर्णयाचा लोकांना काय फायदा होईल याचा विचार त्यांच्या कारकिर्दीत प्रकर्षाने केला जात असे.

त्यांच्याकडे बहुतांश वेळा ज्या-ज्यावेळी सत्ता होती तो काळ संघप्रदेशाचा होता. संघप्रदेशाच्या विधानसभेला मर्यादित अधिकार असतात आणि मुख्यमंत्र्यांनाही तसे एका मर्यादेतच अधिकार असतात. ती मर्यादा सांभाळून राज्यकारभार हाकण्याचे कौशल्य निश्चितपणे राणे यांच्याकडे होते. त्याचमुळे ते राजकारणातून निवृत्त झाले असले तरी समाजमनावर आजही आपले गारुड कायम ठेवण्यात यशस्वी झालेले दिसतात.

केवळ राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर राणे यांच्या नावाचा एक दबदबा होता. एका छोट्या संघप्रदेशाचे मुख्यमंत्री असूनही त्यांच्याविषयी माहिती काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत निदान राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्याला असे. राष्ट्रीय पातळीवर ते गेले असते तर निश्चितपणे चमकले असते. मात्र, त्यांनी ठरवून प्रादेशिक राजकारणातच आपला ठसा उमटवणे जास्त योग्य मानले. काँग्रेस पक्षाकडून त्यांना राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. मात्र, त्यांनी आपल्या मतांशी ठाम राहत गोव्यातच आपण आहे तो बरा आहे, अशी भूमिका घेत ते प्रस्ताव ठामपणे नाकारले.

राणे हे कुशल प्रशासक होते यात वाद नाही. मात्र, अनेकदा ते निर्णय घेताना त्यामागे त्यांची दूरदृष्टी असे. एकदा त्यांच्याबरोबर सत्तरीतल्या ग्रामीण भागात फिरताना अरुंद रस्ते दिसले. विशेषतः त्या रस्त्यावरील पूल जेमतेम एखादे चारचाकी वाहन जाईल एवढेच रुंद होते.

मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ म्हटला की त्यांना विकास करण्यापासून कोण अडवणार असे आम्हाला वाटत होते. मात्र, त्या अरुंद रस्त्यांचे कोडे काही सुटत नव्हते. अखेर राणे यांनाच त्याबाबत विचारले असता किंचित हसून ते म्हणाले, पूल मुद्दामहून अरुंद ठेवलेले आहेत. सत्तरीमध्ये निसर्गसंपदा विपुल आहे. त्यावर लाकूड चोरी करणाऱ्यांचा डोळा आहे. पूल रुंद केले तर जंगल भागापर्यंत ते ट्रक नेऊ शकतील आणि त्यातून लाकूड चोरीला जाऊ शकते. यामुळे पूल अरुंद ठेवले की तिथवर ट्रकच पोहोचू शकणार नाही, अशीही व्यवस्था आहे. असे अरुंद रस्त्यामागील कोडे त्यांनी स्वतःच उलगडून सांगितले.

गोव्याचा विकास करताना त्यांनी काही जागतिक संकल्पना डोळ्यांसमोर ठेवल्या होत्या. विदेशातील चांगल्या संकल्पना येथे राबविल्या पाहिजेत, असे त्यांना प्रकर्षाने वाटत असे. फ्री पोर्ट अशीच एक संकल्पना. त्यांनी त्या संकल्पनेचा पुरस्कार केला होता. त्या काळात इंटरनेटचा तेवढा बोलबाला नव्हता. त्यामुळे ही संकल्पना नेमकी काय आहे हे आम्हा पत्रकारांनाही समजत नव्हते. राणे यांना त्याबाबत विचारले असता त्यांनी आपल्या कामकाजातून पंधरा-वीस मिनिटे बाजूला काढून ही संकल्पना अगदी मुळापासून समजावून सांगितली.

जनतेपर्यंत योग्य माहिती पोहोचली पाहिजे तर माहिती पोहोचवणाऱ्याला ती आधी नीट समजली पाहिजे, अशी भूमिका त्यांची असे. त्यामुळे एखादा गहन विषय असेल तर ते फार अगदी सोप्या भाषेमध्ये सांगत असत.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे बघितले की ते करारी बाण्याचे शिस्तप्रिय आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज भासत नाही. पण त्यांचे मन तेवढेच मृदू आहे. समाजाविषयी कणव असणारा हा नेता प्रसंगी भावुकपणेही निर्णय घेत असे. वर्तमानपत्राचे वाचन हा तर त्यांचा आवडीचा विषय. सुरुवातीच्या काळात वाफोरमध्ये बसून साखळीहून, पणजीला येताना ते वर्तमानपत्रे वाचून हातावेगळी करत असत. एखादा अधिकारी त्यांना भेटायला आला आणि त्याने जर वर्तमानपत्र वाचलेले नसेल तर त्याची भंबेरी उडत असे; कारण राणे नेमके वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे त्यांच्याकडून माहिती मागत असत.

Pratapsinh Rane
Bhoma Road Issue: भोम रस्त्याला जनतेचा विरोध कायमच

वाहन चालवण्याचा छंदही त्यांनी आपल्या धकाधकीच्या सार्वजनिक जीवनाला सांभाळूनच जपला होता. कच्च्या रस्त्यावरून, उंच-सखल भागातून पूर्वी आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक स्पर्धांमधूनही आपली जीप घेऊन ते सहभागी झालेले आहेत. राजकारणात राहूनही आपला सुसंस्कृतपणा जपत सांस्कृतिक क्षेत्रात, लीलया वावरणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. त्याचमुळे कला अकादमीचे अध्यक्षपद अनेक वर्षे त्यांनी आपल्याकडेच ठेवले होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये कला अकादमीचा मोठा विस्तार झाला.

गावागावांत नामवंत कलाकारांना बघण्याची, ऐकण्याची, अनुभवण्याची संधी लोकांना मिळाली होती. आजही कला अकादमी हा विषय काढला की राणे भरभरून बोलतात. ते ऐकले की सांस्कृतिक जीवनाशी ते किती समरस झाले होते, याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांनी लिहिल्यानुसार, आर्यांनी ६६ गावी वस्ती केली म्हणून मडगावचा तालुका सासष्टी झाला, तशी ७० गावे राणेकडे व्यवस्थेला आली म्हणून तो सत्तरी झाला. सत्तरीकर राणे किंवा सतरकर राणे ही कायम उपाधी गोव्यातील साऱ्या ‘राणे’ यांना लाभली. जे राजे झाले, जे प्रमुख सरदार झाले, त्यांना ‘खाशे’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com