धनंजय बिजले
गोव्यात सलग दहा वर्षे भाजपचे दोन्ही सरकारे आणण्यात दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याप्रमाणेच केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा वाटा होता. गोव्याच्या राजकारणाची खडानखडा माहिती असलेल्या गडकरी यांनी आज पणजी भेटीत ‘गोमन्तक’ला विशेष मुलाखत दिली. आमच्या प्रतिनिधीने गडकरी यांच्यासोबत काही मिनिटांचा प्रवास केला. या संवादात त्यांनी उत्पल पर्रीकर व लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे बंड, कॉंग्रेसचे फोडाफोडीचे आरोप तसेच उत्तर प्रदेश, गोव्यातील राजकीय स्थती यावर आपली मते स्पष्ट शैलीत मांडली.
प्रश्न: गोव्यात दलबदलूंना उमेदवारी देत भाजपने आमदारांच्या फोडाफोडीला प्रोत्साहन दिले असा कॉंग्रेसचा प्रमुख आरोप आहे?
उत्तर: अन्य पक्षांतील लोकांना उमेदवारी देणे म्हणजे दलबदल नाही. निवडून आल्यानंतर त्याच चिन्हावर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे म्हणजे दलबदल. खरे तर यावर कॉंग्रेसनेच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांच्या आमदारांना कॉंग्रेस सोडून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मागावी वाटण्याचे कारण काय? कॉंग्रेसप्रती असलेला त्यांचा विश्वास कमी का झाला? याचा कॉंग्रेसने विचार केला पाहिजे. अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिली त्यांच्याबाबत मतदार योग्य निर्णय घेतात.
प्रश्न: दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांच्यासारख्या तरुण चेहऱ्याला पक्षाने का संधी नाकारली?
उत्तर: मनोहर पर्रीकर यांनी स्वतः त्यांच्या हयातीत आपल्या मुलांना राजकारणात कधीही तिकीट दिले नाही. त्याउपर आम्ही उत्पल यांना म्हणत होतो की पणजी सोडून अन्यत्र लढा, पण त्यांना तेथूनच लढायचे होते. तेथे आम्ही अन्य उमेदवाराला शब्द दिला होता. (Nitin Gadkari Latest News Updates)
प्रश्न: आपण लक्ष घातले असते, तर पर्रीकर यांची बंडेखोरी रोखता आली असती?
उत्तर: मध्यंतरी मी कोरोनाने आजारी होतो. गोव्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सांभाळतात. त्यांनी मला परिस्थिती सांगितली होती. उत्पल मलाही भेटले होते. मी त्यांना समजावून सांगितले. तुम्ही अन्य कोणत्या तरी मतदारसंघातून लढा असे मी सुचवले होते, पण ते त्याच मतदारसंघासाठी आग्रही होते. आम्ही तो मतदारसंघ दुसऱ्या उमेदवारास दिला होता. त्यामुळे नाईलाज झाला.
प्रश्न: माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यावरही पक्षाने अन्याय केला अशी भावना आहे?
उत्तर: पार्सेकरांना मनोहर पर्रीकर यांनी फार मोठी संधी दिली होती. संधीचे सोने करणे त्यांच्या हाती होते. त्यावेळी त्यांनी काय केले हे आता बोलण्यात काही अर्थ नाही.
प्रश्न: माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची उणीव भासते का?
उत्तर: पर्रीकर यांच्यासारखा नेता आमची सर्वात मोठी ताकद होती. त्यांची उणीव भासतेच, पण एका गोष्टीचे समाधान आहे ते म्हणजे तरुण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पर्रीकर यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण केले. आपल्या कार्याने त्यांनी पर्रीकर यांची उणीव भरून काढली आहे.
प्रश्न: गोव्यात भाजपला पुन्हा तेरा ते चौदा जागा मिळतील आणि गेल्या वेळेसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होईल असा अंदाज व्यक्त केला जातो. यावर काय वाटते?
उत्तर: या निवडणुकीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे बहुरंगी निववडणूक. दरवेळी भाजपचा मुकाबला थेट कॉंग्रेसशी होत असे. यावेळी तृणमूल कॉंग्रेस व आम आदमी पक्षाने जणू कॉंग्रसलाच पाडण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमुळे कॉंग्रेसच्या मतांचे विभाजन होईल. त्यामुळे गोव्यात भाजपचे बहुमतातील सरकार येईल. याबाबत तृणमूल व आप आम्हाला मदतगार होतील.
प्रश्न: गोव्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा सर्वच पक्षांत शिरकाव झाल्याबद्दल काय वाटते?
उत्तर: याबद्दल सविस्तर माहिती नसल्याने एकदम टिप्पणी करणे चुकीचे ठरेल, पण बहुंताशवेळा विविध आंदोलनांमुळे राजकीय गुन्हे, कलमे दाखल होतात. त्यामुळे खुनाचे, दरोडेखोरीचे गुन्हे कोणावर आहेत व राजकीय गुन्हे किती जणांवर आहेत हे तपासूनच बोलले पाहिजे.
प्रश्न: उत्तर प्रदेशात सध्या भाजपची स्थिती कशी आहे?
उत्तर: उत्तर प्रदेश आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला होता. त्यामुळे लोकांमध्ये विकासाची भूक आहे. कायदा व सुव्यवस्थेची तेथील स्थिती दारुण होती. कोणीही यावे कोणालाही लुटावे अशी स्थिती होती. आज उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था उत्तम आहे. हे योगी सरकारचे मोठे यश आहे आणि दुसरे म्हणजे तेथील विकास. राज्यात मी अमेरिकेप्रमाणे रस्ते केले आहेत. आज उत्तर प्रदेश पूर्ण बदलला आहे. नवे विमानतळ, स्वच्छ गंगा यामुळे आम्हाला बहुमत मिळेल.
प्रश्न: उत्तर प्रदेशात मुस्लीम मते समाजवादी पक्षामागे एकवटत आहेत. यावर तुमचे मत काय आहे?
उत्तर: मुस्लीम मते कोणत्या दिशेला जातील याचे राजकीय मुल्यांकन मी केलेले नाही, पण यादव व मुस्लीम मते ही समाजवादी पक्षाची आधीपासूनच व्होट बॅंक होती. विकासामुळे त्यातील काही आम्हालाही मिळतील.
प्रश्न: पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनामुळे भाजपची स्थिती नाजूक झाली आहे का?
उत्तर: पंजाबमध्ये आमची ताकद जास्त नव्हतीच. उलट यावेळी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत आहे. आधी युतीत पक्षाला पंधरा वीसच जागा मिळत.
प्रश्न: गोव्यासाठी आपल्या खात्याने नेमके काय काम केले?
उत्तर: गोव्यातील चार लेनचे २०६ किलोमीटरचे रस्ते सहा लेन करणार असून त्यासाठी १७ हजार ७२६ कोटी मंजूर आहेत. मुंबई – गोवा राजमार्गासाठी दहा हजार कोटी खर्च करणार आहोत. एकूण २७ हजार कोटींपैकी पंधरा हजार कोटी खर्चही केले आहेत. नव्या मोपा विमानतळासाठी बाराशे कोटी दिले आहेत. शिवाय फिशिंग हर्बर आम्ही गोव्यात बनवित आहोत. त्यामुळे प्रचंड रोजगार निर्माण होतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.