विलास ओहाळ
पणजी :
कोरोनामुळे मंगळवारी आणखी तिघांचे बळी गेले. म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात खोर्ली म्हापसा येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तसेच दक्षिण गोव्यातील आणखी दोघांचे मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत राज्यात कोरोनाचे एकूण २६ बळी गेले आहेत. दुसऱ्या बाजूला आरोग्य खात्याने घेतलेल्या चाचण्यांमध्ये राज्यात दिवसभरात १७४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर कोरोनाबाधितांची एकूण रुग्णसंख्या १५५२ झाली आहे.
राज्य सरकारने कोरोनाविषीय प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार राज्यात आज दिवसभरात ८८ जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून, ती राज्यासह आरोग्य खात्याची चिंता वाढविणारी आहे. आज सकाळी दक्षिण गोव्यातील दोघांचा (दोघांचे वय ६५ होते) बळी गेला, त्यात पुरुष व महिलेचा समावेश आहे. त्यानंतर म्हापशात खोर्ली येथील ५२ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे बळी गेला. कुठ्ठाळी येथील रुग्णांची वाढणारी संख्याही चिंताजनक म्हणावी लागले. काल या ठिकाणचे ३६९ रुग्ण होते, आता ती संख्या ३८० वर गेली आहे. म्हणजे अकराजणांची आज त्यात भर पडली असल्याचे दिसते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वास्कोत कालची सख्या ३१५ होती, ती आता ३५६ वर गेली आहे. यावरून राज्यातील कोरोनाचे रुग्ण वाढीचे प्रमाण लक्षात येत आहे. दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येचा विचार करता नागरिकांमध्ये एकप्रकारची भीती निर्माण झाली आहे.
कुंकळ्ळी, बाळ्ळी
आणखी ९ पॉझिटिव्ह
बाळ्ळी आरोग्य केंद्राने घेतलेल्या कोरोना चाचणीत मंगळवारी आणखी नऊजण पॉझिटिव्ह सापडले. यात औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांचा व एका लहान मुलीचा समावेश आहे. हे बाधित बाळ्ळी व किटला भागातील आहेत. या सर्वांची ही दुसरी चाचणी असून पहिल्या चाचणीत काहीजणांना कमी मात्रा मिळाल्यामुळे दुसरी चाचणी घेण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी २१ रोजी बाळ्ळी आरोग्य केंद्रात ४६ जणांच्या लाळीचे नमुने गोळा केले आहेत. यात कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील एका लोह कारखान्यातील तीस कामगारांचा समावेश आहे. सोमवारपर्यंत बाळ्ळी आरोग्य केंद्रात केवळ सातजण होते. त्यात आणखी नऊ जण जोडले गेले आहेत. दरम्यान, रुग्ण सापडू लागल्याने फातर्पा पंचायत क्षेत्रातीत बोमडामळ परिसर कटेन्मेंट झोन जाहीर केला होता. या भागात आता एकही बाधित शिल्लक राहिलेला नसून सर्व बाधित ठीक होऊन घरी परतले आहेत.
संसर्गस्थळे
कुठ्ठाळी ३८०
वास्को ३५६
साखळी ७९
चिंबल ७९
म्हापसा ६०
मडगाव ५५
फोंडा ५३
प्रवासी (रस्ता, विमान, रेल्वेने आलेले) १४०
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.