गोवा नगर नियोजन कायद्याच्या कलम १७ (२) चा वापर करून फळबागांच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात रूपांतरण केल्याचा आरोप काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. चोडणकर यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, नगर नियोजन मंत्री राणे यांनी ‘सुटकेस’साठी फळबागांच्या जमिनीचे रूपांतर करण्यास परवानगी देण्यास सुरुवात केली.
कलम १७ (२) लागू केल्याने आम्ही या सुधारणांबद्दल अगोदरच चिंता व्यक्त केली होती. अलिकडे लोटली, खोर्ली, आसगाव, रेवोडा आणि चिंबल येथे हजारो चौ. मी. जमिनीचे रूपांतरण झाले आहे.
भाजप सरकार फळबागांच्या जमिनीचे रूपांतर करत असून, परराज्यातील लोकांना त्या जमिनींची विक्री करीत आहे. प्रादेशिक आराखडा २०२१ मधील राहिलेल्या त्रुटीच्या बहाण्याने, जमिनीचे सेटलमेंटमध्ये रूपांतर करण्यासाठी दुरुस्त्या केल्या जात आहेत.
रुपांतरणाबाबत जनतेच्या प्रतिक्रिया काय येतात ते पाहून, पुढे मोठ्या प्रमाणात जमीन विकण्याचा भाजपचा डाव आहे.
17 (2) या कलमांतर्गत कोणत्याही जमिनीचे रूपांतरण होणार नाही, असे मंत्री राणे यांनी सांगितले होते, मग आता ही रुपांतरणे कशी होतात, असा सवाल चोडणकर यांनी केला आहे. आम्ही यापूर्वी व्यक्त केलेली चिंता आता खरी ठरत आहे. राज्याचे मंत्री या कलमाचा वापर ‘सुटकेस’साठी करतील, हे स्पष्ट आहे.
धोकादायक प्रकल्पास मंजुरी !
मिरामार समुद्रकिनाऱ्यावर एक बहुमजली प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे, जो अत्यंत धोकादायक आहे, असेही गिरीश चोडणकर पत्रकात म्हणतात. जमीन विक्री अशाचप्रकारे सुरू राहिल्यास गोव्यातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सुंदर राज्याला व गावांना उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या भाजप सरकारच्या असंवेदनशील दृष्टिकोनाविरुद्ध आम्ही लढा देऊ, असेही चोडणकर यांनी नमूद केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.