Goa Ganesh Chaturthi 2023 : मूर्ती घडवताना मिळते समाधान

Goa Ganesh Chaturthi 2023 : परब बंधूंची श्रद्धा : चिकण मातीच्या गणेशमूर्तींना पसंती; मूर्तीकारांसाठी हवी योजना
Goa Ganesh Chaturthi 2023
Goa Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak

Goa Ganesh Chaturthi 2023 : साळ-मधलावाडा येथे विठू सखाराम परब, त्यांचा भाऊ संतोष सखाराम परब, त्यांचे कुटुंबीय व सहकारी मूर्ती रंगवण्यात व्यस्त आहेत. जूनपासून गणेशमूर्ती बनवण्याच्या कामाला सुरवात होते. गणेशमूर्ती बनवण्याचा व रंगवण्याच्या आमच्या समर्पित कार्यातून आम्हाला खूप समाधान आणि आनंद मिळतो. आम्ही कधीही फायदा वा नुकसानीकडे पाहात नाही किंवा त्याबाबतचा विचार करीत नाही, असे विठू परब सांगतात.

Goa Ganesh Chaturthi 2023
Electricity Problem : हरमल पंचायत क्षेत्रात विजेचा खेळखंडोबा

ग्रामीण भागातील अधिकांश जनता पर्यावरणाबाबत जागरूक आहे. ते जलप्रदूषण टाळण्यासाठी चिकण मातीच्या मूर्तींची मागणी करतात. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्ती सुंदर आणि सुबक असल्या तरी पर्यावरणाला मारक ठरतात. त्यामुळे लोकांच्या आवडीप्रमाणे आम्ही येथे चिकणमातीच्या मूर्ती बनवितो.

या मूर्ती दोन फूट ते पाच फुटांपर्यंत असतात. ही चिकण माती आम्ही पेडणे तालुक्यातील मांद्रे किंवा वारखंड येथील ‘येळवान’ जमीन क्षेत्रातून आणतो. आम्ही तिकडे जाऊन माती काढतो व गोळे करून आणतो. मातीची किंमत द्यावी लागते. चिकण माती आता पुरेशी मिळत नसल्यामुळे मूर्तीकार आगामी काळात अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे सरकारने मूर्तीकारांना चिकण माती उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना राबवावी, अशी मागणी परब बंधूंनी केली.

आम्ही साळमध्ये 13 वर्षांपूर्वी आलो. पेडणे तालुक्यातील पालये हे आमचे मूळ गाव आहे. पालये गावात आमच्या कुटुंबीयांची गणेशमूर्ती शाळा आहे. वडील, काका ,चुलत भाऊ यांच्याकडून या कलेचा वारसा आम्ही जोपासला आहे. 13 वर्षांपूर्वी येथील भूमिका बेकरीचे मालक बुधाजी परब व त्यांच्या बंधूंनी आम्हाला विनवणी केली की आमच्या येथे 10 गणपती करायचे आहेत. आम्ही त्यांचे आमंत्रण स्वीकारले आणि त्याच वर्षी 25 गणेश मूर्ती तयार केल्या.

त्यावेळी साळ येथे असलेली गणेशमूर्ती शाळा तिचे मालक सीताराम नाईक हे वारल्यामुळे बंद पडली. आम्ही 25 वरून दुसऱ्या वर्षी 60 ते 70 गणेशमूर्ती केल्या. त्यानंतर संख्या वाढत जाऊन आता 170 ते 175 मूर्ती बनवतो. तसेच गणपतीचे रंग, रेखाटणी, कलाकुसरही लोकांच्या पसंतीस उतरत असल्याने वर्षानुवर्षे मूर्तीच्या संख्येत वाढ होत आहे, असे परब बंधूंनी सांगितले.

कोविडनंतर मूर्तीसंख्येत वाढ

सुरवातीला साळ-खालचावाडा येथे बेकरीवाले बुधाजी परब यांच्या घरात आमची गणपती शाळा होती; पण आता तिथे जागा कमी पडू लागल्याने मधलावाडा येथे कृष्णा राऊत यांच्या दुकानातील जागेत स्थलांतरित झालो आणि आज आठ-नऊ वर्षे येथे गणपती करीत आहोत. या दोन वर्षांत कोविडनंतर लोक संपर्कात आल्याने मूर्तीसंख्येत वाढ झाल्याचे परब म्हणाले.

रंगकाम हेच जीवन

गणेशमूर्ती शाळेच्या तीन महिन्यांच्या कालावधीनंतर पालये या मूळ गावी जाऊन तेथील आसपासच्या शाळांत शारदोत्सवाला पूजन करण्यात येणाऱ्या श्री शारदा देवीच्या मूर्ती बनवतो. इतर दिवसांत मंदिरे रंगवण्याचे काम करतो तसेच विविध इमारती व घरांचेही रंगकाम करतो. एकंदरीत आमच्या कुटुंबीयांनी मूर्ती व रंगकलेत जीवन वाहून घेतलेले आहे, असे परब बंधूंनी सांगितले.

गणेशमूर्तींना रंग देताना जो आनंद मिळतो तो अन्य कलेत नाही. आम्हाला हाताने रंगकाम करणे खूप आवडते; पण आता गणेशभक्तांच्या पसंतीप्रमाणे रंगकाम व सजावट करावी लागते. पालये येथील गणपती शाळेला शेकडो वर्षे झाली असून त्या शाळेत घरातील महिलाही रंगकामात मदत करतात. मूर्ती बनवताना गणेशभक्तांच्या पसंतीस उतरावे लागत आहे.

- विठू परब, मूर्तीकार, साळ-मधलावाडा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com