मडगाव येथे जे सांडपाणी वाहिनीचे काम सध्या चालू आहे, ते मे महिन्यापर्यंत पूर्ण केले जाणार आहे. मात्र नावेली मतदारसंघातील काम पूर्ण होण्यास थोडा आणखी अवधी लागू शकेल, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम मत्री नीलेश काब्राल यांनी दिले.
आज त्यांच्या हस्ते चांदर येथे रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेल्या नवीन रोड ओव्हरब्रीजचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स तसेच वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा हे उपस्थित होते.
नावेली येथील काम कंत्राटदाराने मध्येच सोडून दिल्याने या कामास विलंब झाला. मात्र यापुढे अशी कामे अर्धवट सोडणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही विकासकामे लोकांवर थोपवत नाही. लोकांची गरज आणि निकड पाहूनच विकासकामांना प्राधान्य दिले जाते, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी दिले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, चांदर गावातील वारसा महत्त्वाची घरे आहेत, याची जाणीव ठेवून या गावात अवजड वाहतूक येण्यास मज्जाव करावा. रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सार्वजनिक खात्यातून मंजूर झालेली कामे झटपट होतील, यासाठी मंजुरीच्या प्रक्रियेला आणखी थोडी गती द्यावी, अशी विनंती केली.
अंतर कमी होणार
चांदर येथे बांधलेल्या या ओव्हरब्रीजमुळे मडगाव - कुडचडे अंतर पाच किलोमिटरनी कमी होणार असून पूर्वी रेल्वे फाटक बंद झाल्यावर लोकांना तिष्ठत राहावे लागत होते, ते आता बंद होणार आहे.चांदर येथील लोकांचा विरोध लक्षात घेऊन या गावातून जाणारा राज्य महामार्ग प्रकल्पही आम्हीं रद्द केला याकडे काब्राल यांनी लक्ष वेधले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.