World Environment Day 2023 : नदीपात्रातून दिसणारा निसर्ग भविष्‍यात दिसेल?

परिसंस्थेतील प्रत्येक सजीव, निसर्गचक्राप्रमाणे नदीच्या पाण्याचा वापर करतो. हवे तेव्हा, हवे तेवढेच घेतो. माणूस मात्र मुळासकट खायला उठला आहे. त्यामुळे, नदीपात्रातून दिसणारा निसर्ग भविष्यात दिसेलच असे नाही.
nature seen from the river
nature seen from the riverGoogle

योग्य मार्गाने आरंभलेले प्रयत्न फलद्रूप होऊन उल्हास निर्माण करतात. चैतन्य आणि उत्साह ही त्याची लक्षणे आहेत, असे संत ज्ञानेश्‍वरांनी म्हटले आहे. त्याच प्रकारे ते दु:ख आणि अश्रूंचे मूल्य याचा अर्थ वेगळ्या प्रकारे सांगतात. अश्रू म्हणजे वेदना, दुर्बलता असा समज आपण करून घेतो, सामाजिक व्यथा, वेदना म्हणजेच अंतर्मनाची खूण. अश्रू हा जीवनाचा ठेवा. त्याला ज्ञानदाता, कल्पतरू, गोविंद, नारायण असे संबोधून ज्ञानेश्‍वरांनी अश्रूचे तत्त्वज्ञान सांगितले आहे.

अश्रू हे दु:खाचा उद्धार करणारे आणि शांती हा आनंदाचा साक्षात्कार देणारा मंत्र आहे. ज्याप्रमाणे प्रेमाचा विसर पडणे कठीण असते, प्रेमाची आठवण झाली तर दु:ख उफाळून येते तशाच प्रकारे आपल्या धरणीमातेवरील पंचतत्त्वांचे आहे. तिच्यावरील पंचतत्त्वांची साखळी एकमेकांत प्रेमाने, आनंदाने नांदली पाहिजे हे बुद्धिमान माणसाने जाणले पाहिजे. म्हणून वसुंधरेवरील हवा, प्रकाश, पाणी, जमीन आणि आकाश यांच्यात माणसाने ढवळाढवळ करू नये, हे विज्ञानशास्त्र प्रत्येकाने पाळले पाहिजे.

जमिनीवरील झरी, तलाव, ओहळ, नदी सतत वाहत राहते हा त्यांचा स्थायिभाव आहे. ते सतत वाहत राहिले नाही तर सजीवांचे स्वास्थ्य बिघडून त्यांचे जगणे संकटात सापडते. पण, मानव आज अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. जलपात्रातून वाहणाऱ्या पाण्यात बेडूक, कृमी, कीटक, पाणसर्प, कासव, मासे, खेकडे, कैक प्रकारची शेवाळे, तृण-वनस्पती, जनावरे, सस्तन प्राणी, हिंस्र प्राणी, पक्षी, फुलपाखरे यांचे जीवन नियमित वाहणार्‍या पाण्यावर अवलंबून असते.

वर्षा ऋतूनुसार वेगवेगळ्या भागांतील नदीनाल्यांचे वेळापत्रक निसर्गावर अवलंबून असते. वर्षा ऋतूत नदीचे पात्र तुडुंब भरल्याने नदीचे दोन्ही काठ ओलसर राहतात. काठावरील भूभाग, खडकांना भरपूर पाणी मिळते. त्यांच्या भूजलाची पातळी वाढते.

nature seen from the river
World Environment Day 2023 : दक्षिण गोव्यासाठी कोळसा वाहतूक ‘डबल ट्रबल’

पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला की नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी हळूहळू कमी होते आणि उन्हाळा सुरू झाला की नदीपात्र हळूहळू कोरडे पडण्यास सुरुवात होते. नदीच्या उगमाकडून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह क्षीण होत असल्याने संपूर्ण नदीचे अगर खाडीचे पात्र कोरडे पडते.

त्यामुळे, समुद्राचे खारे पाणी भरतीच्या वेळी नदीपात्रातून वरच्या भागात पोहोचते व नदीकाठावरील मृदा खारट होण्यास सुरुवात होते. अशा वेळी गोड्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सजीवांचे जीवनचक्र बदलण्यास सुरुवात होऊन ते आपल्यातील दैनिक गोष्टी पूर्ण करतात. नदीपात्रात भरपूर पाणी असताना सजीव प्राणी प्रजोत्पादन करतात. नवजात घेतलेले बहुसंख्य जैविक प्राणी त्या पाण्यात वाढतात.

पात्र सुके पडले की त्यातले बेडूक, कासव, खेकडे, वाळू, चिखल मातीत स्वत:ला गाडून घेतात. कोणत्या ऋतूत पाणी कमी आणि कोणत्या ऋतूत जास्त याची अचूक माहिती त्यांना असते. हे पर्यावरणीय ऋतू जीवनचक्र लाखो वर्षांपासून चालत आले आहे.

गेल्या दोन शतकांपासून पृथ्वीचे गणितचक्र जीवनमान बिघडत चालले असून वसुंधरेच्या भविष्याला धोका निर्माण होत आहे. आज नदीचे जीवन निसर्गावर नसून माणसाच्या स्वार्थापोटी त्याच्या लहरीवर चालवण्याचा प्रयत्न चालवला आहे. पावसाळा सुरू झाल्यावर नदी, ओहळ, तलाव तुडुंब भरून वाहतात.

पावसाळा संपला की त्यांचा प्रवाह कमी होऊन नदीपात्रात उभारलेल्या धरणावर अवलंबून असतो. पावसाच्या पाण्याने भरलेल्या धरणाचे दरवाजे उघडून ज्यावेळी पाणी सोडले जाते, त्यावेळी तिच्या पात्रात जन्मलेली जैवविविधता पाण्याच्या लोटातून वाहत नष्ट होते, याचा मानव विचार करीत नाही.

nature seen from the river
Goa Drugs Case : मोरजी येथे अडीच लाखांचे ड्रग्स जप्त

आपण विचार करतो शेतीबागायतीचा आणि स्वत:साठी पाण्याचा. नदीपात्रातील रेती उपशाचा, तिच्या पात्रात माती भराव घालून पात्र बुजवण्याचा, नदी ओहोळात प्रदूषित पाणी सोडण्याचा आणि प्लास्टिक कचऱ्याचे ढीग ओतण्याचा.

जेटीवर मँगनीस भरताना ते नदीपात्रात पडते. त्यांच्या काठावरील डॉकमधील घनकचरा टाकतात, बार्ज, बोटीचे डिझेल, वंगण ग्रीस नदीपात्रात पडल्याने त्यातील जैविक संपदेवर संकट कोसळते. त्यातील जीवांना स्वच्छ पाणी मिळत नाही. प्रदूषित पाण्याने त्यांचे जीवन संपते, म्हणून नदीनाल्यांची परिसंस्था टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

नदी नाल्यांचे पात्र नैसर्गिकपणे सदासर्वकाळ वाहत राहणे हा तिचा हक्क आहे. आज कर्नाटक सरकारने म्हादईचे पात्र खणून तिचे पाणी विरुद्ध दिशेने वळवले आहे. हा अविचार तिच्या खोऱ्यातील जैवविविधतेच्या नाशाला कारणीभूत झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे कृत्या निसर्गाविरुद्ध आहे.

हल्लीच्या काळात कैक नद्यांवर अनेक धरणे उभारलेली पाहावयास मिळतात. मात्र त्या धरणांनी मोठ्या प्रमाणात गाळ साचतो हे आपण लक्षात घेत नाही. आपल्या पूर्वजांनी गावागावांत वसंत बंधारे उभारून डोंगर दर्‍यात बागायती फुलवल्या नदीकाठी मैदानी भागांत शेती पिकवून गावांना ‘सुजलाम् सुफलाम्’ बनवले होते.

झरी, तळी, विहिरी, नाले स्वच्छ ठेवून पाणी पिण्यास वापरले जायचे. पण आज लोकसंख्या वाढीने शेतीबागायती, डोंगर, वनराई, नदीनाले नष्ट करून बंगल्या-इमल्यांची कॉंक्रीटची जंगले उभी ठाकली आहेत. त्यामुळे हिंस्र प्राणी, मानव वस्तीत पोहोचू लागले आहेत. विजेच्या लखलखाटाने पक्ष्यांची झोप उडाली आहे.

भूमीवरील तापमानवाढीने, वादळे, त्सुनामी महापूर, भूकंप, शीतलहर अशी अरिष्टे आपल्यावर येत आहेत. रोगांना आमंत्रित करून मानव भ्याडपणाने वागत आहे. पण त्याची जाण ठेवत नाही. माणसाने पृथ्वी पादाक्रांत करून तो आता दुसऱ्या ग्रहांचा शोध घेत आहे, त्याला दुसरा ग्रह सापडला तरीसुद्धा तो स्थिर होणार नाही. कारण तो स्वार्थी आहे. ‘वापरा आणि फेकून द्या’, हे करायला तो शिकलेला आहे. पण निसर्ग त्याला ते करू देणार नाही हेही तितकेच सत्य आहे!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com