World Environment Day 2023 : दक्षिण गोव्यासाठी कोळसा वाहतूक ‘डबल ट्रबल’

मायनिंग बायपासचे काय झाले? : पर्यावरणप्रेमींचा सवाल
Coal Transportation
Coal TransportationDainik Gomantak
Published on
Updated on

South Goa : दक्षिण गोव्यातील केपे, कुडचडे आणि सांगे या खाणपट्ट्याशी जोडलेल्या भागांचा श्‍‍वास आतापर्यंत खनिज वाहतुकीमुळे कोंडला जात होता. त्यात आता कोळसा वाहतुकीची भर पडली आहे. ही वाहतूक या भागासाठी सध्या ‘डबल ट्रबल’ ठरत आहे. या प्रदूषणातून लोकांना वाचविणार कोण? असा सवाल पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला पर्यावरणप्रेमींनी केला.

‘खनिज आणि कोळसा वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण’ या विषयावर गोमन्‍तक टीव्हीने आयोजित केलेल्या चर्चेत या कार्यकर्त्यांनी हा सवाल उपस्थित केला. गोमन्‍तकचे ब्युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी संचालित केलेल्या या चर्चेत ‘मिशन बायपास’चे प्रदीप काकोडकर, ‘गोयांत कोळसो नाका’ संघटनेचे फ्रेडी त्रावासो, ‘आप’च्या प्रतिमा कुतिन्हो यांनी आपली मते मांडली.

Coal Transportation
Colvale Jail : कोलवाळ कारागृहात पोलिसांची दबंगगिरी

खनिज वाहतुकीसाठी वेगळा रस्ता असावा यासाठी यापूर्वी आंदोलन केलेले ‘मिशन बायपास’चे प्रदीप काकोडकर यांनी कुडचडे येथील सद्य:स्थितीवर भाष्य करताना सांगितले की, कुडचडे येथे गटारवाहिनी आणि भूमिगत वीजवाहिनी टाकण्यासाठी रस्ते खणून ठेवलेले आहेत. त्यामुळे लोकांना प्रचंड प्रमाणात धुळीच्या प्रदूषणाला तोंड द्यावे लागतेय.

त्यातच आता येथे खनिज वाहतूक आणि कोळसा वाहतूक सुरू झाल्याने लोकांचा जीव पुन्हा गुदमरू लागला आहे. ही वाहतूक करण्यासाठी लोकवस्तीला टाळून पर्यायी बगलमार्ग करण्याचा यापूर्वीच्या सरकारने योजना आणली होती. त्या योजनेचे काय झाले? असा सवाल त्यांनी केला.

‘गोयांत कोळसो नाका’ संघटनेचे फ्रेडी त्रावासो यांनी कोळसा वाहतुकीमुळे जे प्रदूषण होतेय ते खनिज वाहतुकीतून होणाऱ्या प्रदूषणापेक्षा भयंकर असून परिणाम काय होतात हे जाणून घ्यायचे असेल तर लोकांनी चांदर गावाला भेट द्यावी असे सांगितले. या गावात एक कार्बन कारखाना आहे.

त्या कारखान्यातून उडणाऱ्या भुकटीने लोकांचा श्‍‍वास कोंडला जातोय. हे सरकार प्रदूषण रोखण्यासाठी 15 वर्षे पूर्ण झालेली वाहने भंगारात काढू पाहत आहे. मात्र गावात त्याहीपेक्षा जास्त प्रदूषण करणारे भंगारअड्डे त्यांना कसे दिसत नाहीत? एका नेसाय पंचायतीच्या कक्षेत ५०पेक्षा जास्त बेकायदेशीर भंगारअड्डे आहेत. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडे पंचायत खातेही आहे. त्यांना एक प्रदूषण दिसते, दुसरे दिसत नाही का? असा सवालही त्रावासो यांनी उपस्‍थित केला.

Coal Transportation
Goa Theft Case : बसमधून दोन महिलांच्या सोनसाखळ्या चोरीला केपेत चोरट्यांचा धुमाकूळ

अनेक वर्षांपासून गुदमरतोय चांदरवासीयांचा श्‍‍वास

गोव्यात खनिज व्यवसाय तेजीत सुरू होता त्यावेळी रस्ते खनिज कंपन्यांच्या खर्चातून तयार करून घेण्याची मूळ योजना होती. पण काही मंत्र्यांना त्यातूनही स्वतःची तुंबडी भरून घ्यायची होती. त्‍यासाठी त्यांनी हे काम खाण कंपन्यांकडून करून न घेता स्वतःच्या खर्चाने करायचे ठरविले. पण निधीअभावी ही योजनाच बासनात गुंडाळली गेली.

- प्रदीप काकोडकर, ‘मिशन बायपास’चे सदस्‍य

कोळसा वाहतुकीचे परिणाम खनिज वाहतुकीपेक्षाही भयंकर आहेत. चांदर गाव त्‍याचे चांगले उदाहरण आहे. या गावात एक कार्बन कारखाना आहे. त्या कारखान्यातून उडणाऱ्या भुकटीने लोकांचा श्‍‍वास कोंडला जातोय. मात्र त्‍याकडे दुर्लक्ष करून हे सरकार प्रदूषण रोखण्यासाठी १५ वर्षे पूर्ण झालेली वाहने भंगारात काढू पाहत आहे.

- फ्रेडी त्रावासो, ‘गोयांत कोळसो नाका’ संघटनेचे सदस्‍य

ज्यावेळी गोव्यात खनिज वाहतूक बेदरकारपणे सुरू होती, त्यावेळी ट्रकांखाली चिरडून लोक मरायचे. खाणपट्ट्यातील रस्ते वाहतूक करण्यासाठी सक्षम आहेत की नाहीत, याचा कुठलाही अभ्यास न करता ही वाहतूक करायला दिली गेली. सरकार पुन्हा खाणपट्ट्यातील लोकांचा जीव धोक्यात घालू पाहत आहे.

- प्रतिमा कुतिन्हो, ‘आप’च्या नेत्‍या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com