तिळारी पाटबंधारे (Tilari Irrigation) प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गोव्यातील (Goa) कालव्याचे साफसफाईचे (Canal cleaning) काम सध्या सुरु असले, तरी डिचोलीत काही भागात साफसफाईचे काम अर्धवट करण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काही ठिकाणी पालापाचोळा कालव्यातच टाकण्यात आल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे कालव्याच्या स्वच्छता कामाबद्दल संशय निर्माण होत असून, हिच काय ती साफसफाई असा प्रश्न निर्माण होत आहे.
'मनरेगां'तर्गत काम
ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) (मनरेगा) हे काम करण्यात येत आहे. गोव्यातील डिचोलीसह पेडणे तालुक्यात येणाऱ्या 120 किलोमीटर लांबीच्या कालव्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. मनरेगा अंतर्गत कालव्याची साफसफाई करण्याच्या योजनेला गेल्यावर्षी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. तत्पूर्वी दरवर्षी हे काम कंत्राट देऊन करण्यात येत होते. मनरेगा अंतर्गत काम करण्यात येत असल्यामुळे गेल्या वर्षीपासून स्थानिकांना रोजगाराची संधी प्राप्त होत आहे.
पालापाचोळा कालव्यात
सध्या डिचोली भागात येणाऱ्या सर्वण, वाठादेव आदी ठिकाणी कालव्याच्या स्वच्छतेचे काम करण्यात आले आहे. कालव्यात वाढलेले गवत, वेली-झुडपे छाटून कालवा स्वच्छ करण्यात आला असला, तरी बऱ्याचठिकाणी छाटलेली वेलीझुडूपे आदी पालापाचोळा कालव्यातच टाकण्यात आल्याचे आढळून येत आहे. तर सर्वण येथे धावस्करवाड्याच्या माथ्यावरील कालव्याची अद्याप साफसफाई करण्यात आलेली नाही. या काळव्यात वाढलेले गवत "जैसे थे' आहे. गेल्या महिन्यात 10 तारखेला तिळारीच्या कालव्याला मणेरी येथे भगदाड पडल्यापासून गोव्यातील कालवा कोरडा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.