Panjim News: थॉमस गॅरेजजवळील सांतिनेज खाडीवरील पुलाचे काम गतवर्षी सुरू झाले; परंतु तो पूल अद्याप उभारला गेला नाही.
खाडीवर इतर ठिकाणच्या पुलांची उभारणीही सुरू होऊन त्यावरून वाहतूक सुरू झाली. त्यामुळे थॉमस गॅरेजजवळील पूल जणू ऐतिहासिक बांधणीचाच होणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
थॉमस गॅरेजजवळील अरुंद पूल पाडून त्याठिकाणी रुंद पूल उभारण्याचे काम गतवर्षीपासून सुरू झाले; परंतु सुरुवातीला ज्या कंत्राटदाराने हे काम घेतले होते, त्याने अर्धवट सोडून दिले. त्यानंतर ते काम पूर्ण करण्यासाठी दुसरा कंत्राटदार शोधावा लागला.
सध्या काकुलो मॉल ते इंटरनॅशनल हॉटेल हा मार्ग ‘स्मार्ट’ करण्यासाठी घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील जुना डांबराचा थर पूर्णपणे काढला आहे. याच मार्गावर हा पूल उभारणीचे काम सुरू आहे.
या पुलाच्या कामाला झालेला विलंब आता स्मार्ट सिटीच्या कामांच्या आड लपला आहे. थॉमस गॅरेजजवळ पुलाचे काम महापालिकेने हाती घेतले खरे;
पण तोपर्यंत स्मार्ट सिटीच्या कामांमुळे रस्ते खोदकाम सुरू झाले. सांतिनेज खाडीवर तीन पूल उभारून पूर्णही झाले; पण अजूनही थॉमस गॅरेजजवळील पुलाचे काम काही पूर्ण होत नाही.
माजी उपमहापौरांचे निवेदन
माजी उपमहापौर वसंत आगशीकर यांनी आयुक्तांना बुधवारी (ता. १५) एक निवेदन सादर केले. त्यांनी स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या कामांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. स्मार्ट सिटीचे जे काम सुरू आहेत, त्यात अनेक चुका झालेल्या आहेत.
मलनिस्सारणाच्या वाहिन्यांसाठी जे चेंबर उभारण्यात आले आहेत, ते पोर्तुगीजकालीन असलेल्या गटारांवर उभारले आहेत, त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रकार घडण्याची भीती आहे, हेही त्यांनी लक्षात आणून दिले आहे. आगशीकर यांनी कामांबाबत जे निवेदन दिले आहे, ते सध्या महापालिकेत चर्चेचा विषय ठरला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.