पिसुर्ले : आजच्या काळात विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञाना बरोबर सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच कला क्षेत्रातील शिक्षण घेणे गरजेचे आहे, त्यामुळे भविष्यात सदर विद्यार्थ्यांना खुप फायदा होणार, त्यासाठी पालकांनी मुलांवर कोणत्याही प्रकारचे दडपण न आणता त्यांच्या इच्छेनुसार दहावी, बारावी नंतरचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना पर्याय उपलब्ध करून द्यावा, त्यामुळे प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत होऊन शिक्षणात उच्च भरारी घेण्यास फार सोपे होईल. असे प्रतिपादन पर्ये मतदार संघाच्या आमदार डॉ दिव्या राणे यांनी सरकारी माध्यमिक विद्यालय पिसुर्ले आयोजित विद्यार्थी गौरव तसेच बक्षीस वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.
या प्रसंगी व्यासपीठावर राज्याचे माजी मुख्यमंत्री (CM) तथा माजी आमदार प्रतापसिंह राणे, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, सरपंच जयश्री परब, उपसरपंच रोहीदास राणे, पंच देवानंद परब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबलो पर्येकर, मुख्याध्यापक उल्हास गावकर, हगांमी मुख्याध्यापक सुरज नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार राणे म्हणाल्या की शालेय जीवनात दहावी नंतर पुढे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचा नवा अध्याय सुरू होतो, त्याचीं जाणीव शालेय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे, त्याच प्रमाणे शालेय शिक्षका बरोबर आई वडील हे मुलांचे पहिले शिक्षक आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना योग्य संस्कार देताना त्याच्या आवडीचे शिक्षण घेण्यासाठी पुर्ण मोकळीक दिली पाहिजे. त्याच बरोबर सद्या खाजगी विद्यालया प्रमाणे ग्रामीण भागातील शाळा विद्यालये यांच्यात बरीच सुधारणा झाली आहेत. त्यात शाळेचे मुख्याध्यापक दुरदृष्टी असलेले हवे आहेत, त्यात पिसुर्ले विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला असता मुख्याध्यापक उल्हास गावकर व इतर शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे विद्यार्थी शिक्षणाबरोबरच इतर क्षेत्रात चमकत असलेला दिसत आहे. ही चांगली बाब असून याची दखल सरकार (Government) पातळीवर घेऊन विद्यालयाला कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहील अशी ग्वाही शेवटी आमदार डॉ दिव्या राणे (Divya Rane) यांनी दिली.
अंगात प्राण असे पर्यंत जनतेची सेवा करील - माजी आमदार प्रतापसिंह राणे
या कार्यक्रमांत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना पर्ये मतदार संघात गेली 50 वर्षे प्रतिनिधीत्व करून या निवडणूकी पासून राजकीय निवृती घेतलेले माजी आमदार प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांनी आपण जरी राजकारणातून निवृत्ती घेतली तरी सत्तरी तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहे, या 50 वर्षाच्या काळात जे काही शक्य झाले ते जनतेसाठी केले आहे, सद्या विविध पातळीवर स्पर्धात्मक वातावरण आहे, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना योग्य प्रकारचे संस्कारमय शिक्षण दिले पाहिजे. या पुर्वी प्रमाणे सत्तरी तालुक्यातील लोक मागास राहिले नसून, खेडोपाडी उच्च दर्जाची शिक्षण घेऊन मुलांनी नाव कमवले आहे. त्यामुळे या पुढे सत्तरी तालुक्यात नोकरी साठी शिक्षण घेणारे नाही तर शिक्षण घेवून इतरांना नोकरी देणारी पीढी तयार केली पाहिजे.
यावेळी खाण बंदी वर बोलताना माजी आमदार (MLA) प्रतापसिंह राणे म्हणाले की खाण व्यवसाय बंद पडण्यास खुप कारणे आहेत, परंतू ती कारणे शोधत न बसता विद्यमान सरकारने खाण व्यवसाय तात्काळ सुरू करण्याचें प्रयत्न करावेत. सत्तरी तालुक्यातील काही परिसर खाण व्याप्त भागात येत आहे. या भागातील नागरिकांनी फार हाल सोसले आहेत. याची दखल घेऊन सरकारने कायदेशीर खाण (Mining) व्यवसाय सुरू करावा असे शेवटी म्हणाले.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर आणि पंच देवानंद परब यांची समयोचित भाषणे झाली. यावेळी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, त्याच प्रमाणे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना (Student) बक्षिसे देण्यात आली.
या वेळी मुख्याध्यापक सुरज नाईक यांनी स्वागत केले, नंदा माजीक यांनी वार्षिक अहवाल सादर केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक भैरू झोरे आणि शिक्षिका कविता पावणे हीने केले तर मदांहास साळगावकर यांनी आभार व्यक्त केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिक तसेच पालकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.