पणजी: राज्य पर्यावरण आघात मूल्यांकन समितीने झुआरी व मांडवी नदीतील रेती उत्खननासाठी पर्यावरण दाखले देण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यभरातील बांधकामांसाठी कायदेशीरपणे रेती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी खाण खात्याने या दोन्ही नद्यांतून पारंपरिकपणे रेती काढण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत.
पर्यावरण खात्यातून मिळालेल्या माहितीनुसार या समितीची बैठक आज पर्यावरण खात्याच्या परिषद सभागृहात झाली. यापूर्वी या समितीने दिलेले परवाने उच्च न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव रद्दबातल ठरवले होते. त्यामुळे या खेपेला निर्णय घेताना जिल्हा अहवालांचा आधार घेण्यात आला आहे.
पर्यावरण दाखला देताना सकाळी ६ ते सायंकाळी ६ यावेळेतच रेती काढता येईल, पावसाळ्यात १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत रेती काढता येणार नाही, अशा अटी घातल्या आहेत. मांडवी व झुआरी नदीतून पारंपरिक पद्धतीने वर्षाला प्रत्येकी १ हजार घनमीटर रेतीच काढता येणार आहे.
नदीच्या मुखाजवळ केवळ तीन मीटर खोलीपर्यंतच रेती काढता येणार आहे. नदीच्या दोन्ही काठांपासून रेती काढण्यात येणारी जागा २५ मीटर अंतरावर असली पाहिजे. पुलापासून ५०० मीटर अंतरात रेती काढता येणार नाही.
मदीच्या मुखाजवळ असलेल्या बेट परिसरा ५० मीटरपर्यंत रेती काढता येणार नाही. रेती काढण्यात येणाऱ्या जागेची हद्द ठरवल्यानंतरच रेती काढण्यासाठी परवाना द्यावी असेही समितीने म्हटले आहे.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने जानेवारी व मे मध्ये नदीपात्राचा या संदर्भात अभ्यास करून अहवाल देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. परवान्यांपैकी ७० टक्के परवाने पारंपरिकपणे रेती काढणाऱ्यांनाच द्यावेत अशीही अट घालण्यात आली आहे.
समितीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समितीचे सदस्य सचिव तथा पर्यावरण संचालक जॉनसन फर्नांडिस आणि समितीचे सदस्य डॉ. दीपक गायतोंडे सहभागी झाले होते.
राज्यातील रेती उत्खनाविरोधात दाद मागणारी राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम खंडपीठासमोर विचाराधीन असलेली याचिका खंडपीठाने निकालात काढली. याविषयीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर विचाराधीन असल्याचे कारण देत ही याचिका निकालात काढण्यात आली आहे. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीची लवादाने स्वेच्छा दखल घेतली होती.
मांडवी नदी- कोठंबी, डिंगणेसुर्ल, नावेली, बेतकी, आमोणे, पिळगाव आणि खांडोळा. झुआरी नदी- बोरी, शिरोडा, माखाजन आणि पंचवाडी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.