प्रसाद सावंत
पणजी: सोमवारी 1 ऑगस्टपासून राज्यात नव्याने मासेमारी हंगामाला सुरुवात होत असली तरी हवामानातील बदल आणि कामगारांच्या अभावामुळे प्रत्यक्षात ट्रॉलर्स गणेश चतुर्थीनंतर पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. 1 जूनला सुरू झालेली मासेमारी बंदी 31 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. यासाठी मच्छीमार खात्याकडूनही तयारीला सुरवात करण्यात आली आहे. खात्याचे अधिकारी एकूणच परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
(fishing ban that started on June 1 will end on July 31 in goa)
सध्या सुट्टीवर गेलेले परराज्यांतील कामगार अजूनही परतलेले नाहीत. तसेच हवामान योग्य नसल्याने मोठे ट्रॉलर्स सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना महामारीमुळे मासेमारीच्या गेल्या दोन हंगामांवर विपरित परिणाम झाला होता. त्यातच डिझेल, शिधा यांचे दर वाढल्याने याचा फटका मासेमारी उद्योगाला बसला. कोरोना काळात कामगारांच्या उदरनिर्वाहाची गंभीर समस्या निर्माण झाली होती. परंतु, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने हंगामाची तयारी जोरात सुरू आहे.
गोव्यातील बहुतांश ट्रॉलर्सवर काम करणारे कामगार हे बिहार, ओडिशा, झारखंड, तामिळनाडू या राज्यांतून येत असल्याने ते मासेमारी बंदीचा काळ संपला, तरी उशिराच परततात. बिगर गोमंतकीय कामगारांवर ट्रॉलर्स अवलंबून असल्याने त्यांच्याशिवाय ते सुरू होऊ शकत नाहीत. त्यामुळे गणेश चतुर्थी झाल्यानंतर ट्रॉलर्स पूर्ववत सुरू होतील, असे सांगण्यात येते. ट्रॉलर्स मासेमारीसाठी समुद्रात जाणार की नाही, हे हवामानावर निर्धारित असते. त्यामुळे बंदी संपल्यानंतर सहसा मोठे पर्स सीनर ट्रॉलर्स लगेच मासेमारीसाठी जात नाहीत. त्यासाठी हवामान पूरक लागते. आवश्यक पाण्याचा प्रवाह आवश्यक आहे. त्यासाठी सप्टेंबरमध्ये चतुर्थीनंतर हे मासेमारी करायला सुरू करतात. दरम्यान, कामगार परतल्यास लहान ट्रॉलर्स मासेमारीसाठी जातात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.