Goa GST Museum : पणजीत उभारलेल्या ‘धरोहर’ या राष्ट्रीय सीमा शुल्क आणि जीएसटी संग्रहालयाचे केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज राष्ट्रार्पण झाले. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि गोव्याचे वाहतूक, पर्यटन आणि पंचायतराज मंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते..
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून वित्त मंत्रालय 6 ते 12 जून या कालावधीत आयकॉनिक आठवडा साजरा करत आहे. त्याचाच भाग म्हणून गोव्यात आज हा कार्यक्रम झाला. हे संग्रहालय ज्या इमारतीत आहे, त्या 400 वर्षे जुन्या वास्तूमध्ये असलेल्या एकाच दगडातून बनवलेल्या शिल्पकृतीवरील सोनेरी वाळू बाजूला सरकावून अर्थमंत्र्यांनी उदघाटन केले.
सीमा शुल्क विभागाची गाथा
‘धरोहर’ हे भारतातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू संग्रहालय आहे, जिथे भारतीय सीमा शुल्क विभागाने, तस्करी, चोरी होत असताना जप्त केलेल्या देशातल्या प्राचीन मूर्ती आणि इतर स्थापत्य वस्तू ठेवल्या आहेतच; त्याशिवाय देशाच्या आर्थिक आघाड्यांचे, देशाच्या वारशाचे, सौंदर्याचे आणि समाजाचे रक्षण करताना, सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवायांची माहिती येथे पाहायला मिळेल. अशा प्रकारचे हे देशातील पहिलेच संग्रहालय आहे.
‘बॅटल ऑफ विट्स’ गॅलरी
‘धरोहर’ मध्ये एकूण आठ गॅलरी आहेत. संग्रहालयाची ओळख करून देणारी, कररचनेचा इतिहास सांगणारी, आर्थिक आघाड्या सांभाळणाऱ्या कामांविषयीची, भारतातील कला आणि वारसा जपणारी, भारतातील निसर्ग-प्राणीसृष्टीचे रक्षण करणारी, आपल्या सामाजिक कल्याणाची विश्वस्त असणारी आणि भारतीय अप्रत्यक्ष कराचा प्रवास- मीठावरील करापासून जे जीएसटीपर्यंतचा प्रवास सांगणारी गॅलरी. या संग्रहालयाचे खास सामर्थ्य आणि वैशिष्ट्य म्हणजे, तिथली ‘बॅटल ऑफ विट्स’ गॅलरी ही आहे.
जीएसटीचा प्रवास दृष्टीक्षेपात
धरोहर संग्रहालयात जीएसटी गॅलरी ही नवी जोड आहे. देशात पहिल्यांदाच राबवल्या जात असलेल्या या उपक्रमातील ही जीएसटी गॅलरी जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा करायच्या संकल्पनेपासून-निर्मिती ते अंमलबजावणीपर्यंतच्या 20 वर्षांच्या प्रवासाचा फेरफटका घडवते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.