- आसावरी कुलकर्णी
Bodageshwar Jatra: गोमंतभूमी, उत्सव प्रिय भूमी. निसर्गाला देव मानणाऱ्या इथल्या भूमिपुत्राने प्रत्येक घटकात देवत्व पहिले आहे. मग ते वारूळ रुपी भूमिका किंवा कलश रुपी लईराई. इथल्या देवत्वाची कल्पना फार विस्तारलेली आहे. एखाद्या झाडाच्या बुंध्यावर गणपतीची सोंड दिसली तरीही त्याचे मंदिर तयार होते. देवाच्या खालोखाल इथला भूमिपुत्र मानतो तो राखणदाराला. कोकण आणि गोव्यामध्ये देवचार नावाची संकल्पना फार प्रचलित आहे. विशेषतः दोन गावांच्या सीमेवर एखाद्या घनदाट झाडावर, देवराईत त्याचा वास असतो असे मानले जाते.
पूर्वीच्या काळी वाहतुकीची साधने नसताना लोक चालत किंवा बैलगाडीने प्रवास करायचे. शेतीची रानातली काम उरकून अंधारल्यावेळी घरी परतायचे. अशावेळी पाठीशी हा राखणदार असतो, असा विश्वास लोकांमध्ये दृढ आहे. एखाद्या ठिकाणी चुकलेल्या वाटसरूला सुरक्षित घरी कसे पोहचवले अशा वदंता, कथा प्रचलित आहेत. राखणदाराला प्रत्यक्ष कुणीही पहिले नाही, पण कित्येक जणांनी त्याचे वर्णन डोक्याला मुंडासे, धोतर, खांद्यावर कांबळ आणि हातात घुंगरू लावलेली काठी, पायात चामड्याच्या चपला.. असे केलेले आहे. याच संकल्पनेतून राखणदार, आजोबा, अशा नावांनी किंवा ज्या झाडावर त्याचा वास आहे, त्या झाडाच्या नावाने ती स्थाने प्रसिद्ध आहे.
देवचार चूड दाखवून वाटसरूंना वाट दाखवतो, पण त्याला अपशब्द वापरणाऱ्यांना तो गायब करतो किंवा शिक्षा देतो, असाही अनुभव लोकांना आहे. सूर, रॉट, केळी बिड्या हे त्याला आवडणारे पदार्थ लोक अर्पण करतात. आणि आपल्या मनोकामना पूर्ण करून घेतात. लग्नकार्याला सीमा ओलांडताना पानाचा विडा आजही ठेवला जातो. कालांतराने या झाडांच्या ठिकाणी मोठमोठ्या मंदिरांची स्थापना झाली. अशातूनच उभ्या राहिलेल्या कित्येक देवळातून मोठे उत्सव साजरे होतात. लोक मोठ्या भक्तीभावनेने या उत्सवात सहभागी होतात.
गोव्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या म्हापसा या शहराचा असाच एक राखणकर्ता म्हणजे देव बोडगेश्वर. म्हापसा हे पूर्वीच्या काळापासून बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. पण इथल्या आसपासच्या परिसरात शेती केली जात होती. या शेतांच्या बांधावर मोठ्या प्रमाणात बोडगिणीची झाडं होती. नाव ऐकायला जरा विचित्र वाटत पण आपल्याला आश्चर्य वाटेल हे झाड म्हणजे केवड्याचे स्त्रीपुष्प असलेले झाड आहे. केवड्या सारखा गंध त्याला नसतो, फुलेही फिकट रंगाची असतात. गोव्यातल्या शेत बांधावर हमखास ही झाडे सापडतात किंवा लावली जातात. कारण या झाडाची मुळे मातीची धूप होण्यापासून रक्षण करतात. बांधावर लावल्यामुळे बांध पाण्याच्या प्रवाहातही टिकून राहतो. तसेच जमिनीचा ओलावाही टिकून राहतो. अशाच घनदाट अशा बोदगिणीच्या झुडुपामध्ये देवचाराचा वास आहे, जो म्हापसेकरांचे रक्षण करतो, अशी गाढ श्रद्धा इथल्या लोकांमध्ये आहे.
बोडगिनीच्या झाडात रहातो म्हणून तो बोडगेशवर. या बोडगेशवराने अनेक भाविकांना आपल्या अस्तित्वाचा अनुभव दिल्याच्या कथा प्रचलित आहेत. गेल्या काही वर्षात या ठिकाणी मंदिर बांधले गेले. आणि आता ते फार प्रसिद्ध आहे. या देव बोडगेशवराचा वार्षिक उत्सव आजपासून तीन दिवस साजरा होत आहे. दरवर्षी पौष महिन्यात शुक्ल त्रयोदशी ते पौर्णिमा असा हा उत्सव साजरा होतो. गोव्यातूनच नव्हे तर गोव्या बाहेरूनही लाखो लोक दरवर्षी या जत्रेत सहभागी होतात. आपल्या मनोकामना मागतात. मनोकामना पूर्ण झालेले लोक मान्य केलेले दान देवाला देतात. आता या जत्रेने भव्य असे रूप धारण केलेले आहे.
या जत्रेच्या निमित्ताने भरणाऱ्या दुकानांमुळे कचरा प्रदूषण होऊ नये याची खबरदारी म्हापसा मुनिसिपालटीने घेतलेली आहे. चार दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. या वर्षी सोन्याचा दंड देवाला अर्पण केला जाणार आहे. वृक्ष वेलींमध्ये वसलेल्या शाश्वत ऊर्जेच्या पूजेचे हे एक उत्तम उदाहरण आहे. अर्थात बोडगिणीच्या सानींनध्यात राहाणारा हा राखणदार त्याच झाडावर बसून आपला कौतुक सोहळा पहाण्यास गुंग असेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही...
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.