Goa Agriculture: राज्यात ऐन चतुर्थीच्या काळात पावसाने जोर धरल्यामुळे लोकांच्या उत्साहावर काही प्रमाणात विरजण पडत असले तरी हा पाऊस शेतीसाठी पोषक आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. मागील महिनाभरापासून राज्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस पडला नव्हता. जमिनीत ओलाव कमी होत होता.
जर आणखी काही दिवस पाऊस पडला नसता तर भात पीक धोक्यात आले असते. पर्जन्यराजाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. हा पाऊस शेतीसाठी खास करून भातशेतीसाठी खूपच आवश्यकच होता.
यंदाचा ऑगस्ट हा सर्वात उष्ण महिना ठरला. या महिन्यात केवळ 12 इंच पाऊस पडला. अर्धा सप्टेंबरही तसाच गेला. पण आता पावसाने जोर धरला आहे. यंदा राज्यात जूनच्या मध्यावर मॉन्सूनचे आगमन झाले. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक रिकोर्ड ब्रेक पाऊस पडला. राज्यात आतापर्यंत 112 इंच पावसाची नोंद झाली आहे. तो सरासरीपेक्षा थोडा जास्तच आहे.
काकडी, दोडकी, भाजीपाल्याला सुगीचे दिवस
भातशेतीसोबतच काकडी, दोडकी, भाजीपाला, अळूमाडी, चिबूड तसेच इतर भाज्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नसल्याने तसेच तापमानातही वाढ झाल्याने ही पिके धोक्यात आली होती. काकडी तसेच दोडकीच्या वेली सुकत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
राज्यात यंदा मान्सूनने आगमन उशिरा झाले. त्यामुळे शेतीची लागवडही उशिरा झाली. जुलै महिन्यात अतिरिक्त पाऊस पडला, परंतु मागील महिन्यापासून पावसाने विश्रांती घेतली होती. हा पिकांच्या पोषणाचा काळ असल्याने या दिवसात योग्य पाऊस पडला नाही तर पीक कमी येऊ शकते. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस अपेक्षित आहे, अन्यथा ती शेतीसाठी चिंतेची बाब ठरू शकते.
- नेव्हिल आल्फोन्सो, कृषी संचालक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.