Cuncolim Crime News
केपे: कुंकळ्ळीत ११ सप्टेंबर रोजी एका इसमास झालेल्या मारहाणप्रकरणी तिघांना अटक करा,अशी मागणी घेऊन कुंकळ्ळी पोलिस स्थानकावर मुस्लिम समाजबांधवांनी गर्दी केल्याने आज सांयकाळी तणाव निर्माण झाला. या प्रकरणात हिंदू- मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी स्थिती योग्य रित्या हाताळून संशयितांवर ४८ तासांत कारवाईचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला. दरम्यान, काणकोणात जुलूस काढण्यास विरोध झाल्याची प्रतिक्रिया म्हणून हा जमाव एकत्र झाल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार विराज देसाई, संदेश केंकरे व स्वप्नेश देसाई या तिघांनी मिळून पायराबांद कुंकळ्ळी येथे एका ३५ वर्षीय मुस्लिम इसमाला दि.११ रोजी मारहाण केली होती. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. सध्या काणकोण येथील विषय गंभीर असताना सदर घटना घडल्याने आज संध्याकाळी शेकडो मुस्लिम युवकांनी कुंकळ्ळी पोलिस स्थानकावर धडक देऊन युवकाला मारहाण करणाऱ्यांना अटक करा, अशी मागणी केली.
यावेळी मुस्लिम युवकांच्या विरोधात हिंदू युवकही मोठ्या संख्येने कुंकळ्ळी पोलिस स्थानकावर जमल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस स्थानकाबाहेर जमलेल्या हिंदू युवकांनी ‘जय श्री राम’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केल्याने वातावरण तंग होणार,असे चित्र दिसत होते. पण पोलिसांनी स्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही.
मुस्लिम युवकाला मारहाण करणाऱ्यांना त्वरित अटक करण्यात यावी, अन्यथा आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा लोकांनी घेतल्याने त्यांना पोलिसांनी समजावण्याचा बराच प्रयत्न केला.कुंकळ्ळी पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच मारहाण करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करून घेतली आहे. तसेच विरोधी गटातील लोकांनीही आपली तक्रार दाखल केली असून कुंकळ्ळी पोलिसांनी याविषयी चौकशी करून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी सांगितले.
यावेळी मुस्लिम जमावाच्या गटाने सदर तिघांही आरोपी विरुद्ध कठोर करवाई करण्याची मागणी केली असून हा कुंकळ्ळीतील सर्व धर्मीय लोक एकोप्याने राहतात. त्यात फूट घालण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगून २४ तासांच्या आत त्यांना अटक करावी, असे त्यांनी सांगितले.पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी यावेळी लोकांना समजावून परत पाठविण्यात महत्वाची भूमिका बजावली. यावेळी पोलीस निरीक्षक डायगो ग्रेसीयस आपल्या पोलिस फौजफाट्यासह उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.