कोलवाळमध्ये टॅक्सी चालकांची गर्दी! मोपा विमानतळावरील 'वसुली' विरोधात आंदोलन; 210 रुपये शुल्कामुळे संतापाची लाट

Mopa Airport Taxi Protest : पिकअप झोनमध्ये २ ते ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास आकारल्या जाणाऱ्या शुल्काविरोधात टॅक्सी चालकांनी निषेध नोंदवला
GMR waiting fee
GMR waiting feeDainik Gomantak
Published on
Updated on

Taxi Drivers Protest at Mopa Airport: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) येथील वाहन व्यवस्थापन आणि शुल्क वसुलीच्या नवीन नियमांनी टॅक्सी चालकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण केली आहे. पिकअप झोनमध्ये २ ते ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास आकारल्या जाणाऱ्या २१० रुपयांच्या शुल्काविरोधात बुधवारी (दि.७) शेकडो टॅक्सी चालकांनी कोलवाळ येथे एकत्र येत निषेध नोंदवला.

२-५ मिनिटांची मर्यादा 'अवास्तव'

टॅक्सी चालकांचे म्हणणे आहे की, प्रवाशांना पिकअप झोनमध्ये शोधणे, त्यांचे जड सामान गाडीत भरणे आणि त्यांच्याशी समन्वय साधणे यासाठी केवळ २ ते ५ मिनिटांचा वेळ अत्यंत अपुरा आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध प्रवासी किंवा मोठी कुटुंबे सोबत असतील, तर गाडीत बसण्यासाठी किमान १० ते १५ मिनिटांचा वेळ लागतो. अशा परिस्थितीत विमानतळ चालक कंपनी 'जीएमआर' (GMR) कडून आकारले जाणारे २१० रुपये शुल्क म्हणजे एक प्रकारची लूट आहे.

GMR waiting fee
Mopa Airport: पहिल्यांदा गोव्यातच! ‘मोपा’ विमानतळावर डिजिटल व्हिडिओवॉल; भारतातील पहिलेच डिझाईन

कोलवाळमध्ये एकत्र जमले शेकडो चालक

या जाचक नियमाचा निषेध करण्यासाठी आज सकाळी मोठ्या संख्येने टॅक्सी चालक कोलवाळ येथे जमा झाले. यावेळी त्यांनी जीएमआर प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. टॅक्सी चालकांनी स्पष्ट केले की, या शुल्कामुळे त्यांच्या दैनंदिन उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे.

पोलीस संरक्षणात शिष्टमंडळ रवाना

आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी १५ सदस्यांचे एक शिष्टमंडळ तयार केले आहे. हे शिष्टमंडळ आता पोलीस संरक्षणात मोपा विमानतळावर जीएमआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहे. या भेटीत २१० रुपयांचे हे शुल्क रद्द करावे किंवा वेळेची मर्यादा वाढवून मिळावी, अशी मागणी केली जाणार आहे.

पर्यटनावर परिणामाची भीती

"विमानतळावर उतरल्यानंतर पर्यटकांना सन्मानाची वागणूक मिळणे अपेक्षित आहे, पण अशा नियमांमुळे पर्यटकांना घाई करावी लागते, ज्याचा परिणाम गोव्याच्या पर्यटनावर होत आहे," असे एका टॅक्सी चालकाने सांगितले. जर ही मागणी मान्य झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही चालक संघटनांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com