

पणजी: भारतीय फुटबॉलमधील अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीत शुक्रवारी टाटा स्टीलने ‘इंडियन सुपर लीग’मधील (आयएसएल) जमशेदपूर एफसीची १०० टक्के मालकी गोव्यातील चर्चिल ब्रदर्स स्पोर्टस क्लबकडे अवघ्या १०० रुपयांच्या नाममात्र मोबदल्यात हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली.
जमशेदपूर फुटबॉल अँड स्पोर्टिंग प्रायव्हेट लिमिटेडमधील (जेएफएसपीएल) आपला संपूर्ण हिस्सा टाटा स्टीलने चर्चिल ब्रदर्सकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली. या संंबंधी माहिती टाटा स्टीलतर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.
टाटा स्टीलकडे जेएसपीएलचे ४ कोटी ८ लाख समभाग होते. या संपूर्ण हिस्स्याचे हस्तांतरण करण्यासाठी टाटा स्टील आणि चर्चिल ब्रदर्स यांच्यात शेअर पर्चेस करार करण्यात आला. मात्र, या व्यवहाराला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची (एआयएफएफ) मंजुरी तसेच अन्य आवश्यक औपचारिकता पूर्ण होणे बाकी आहे. सर्व अटी पूर्ण झाल्यास व्यवहार ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
या व्यवहारामुळे जमशेदपूर एफसीचा ‘आयएसएल’चा स्पोर्टिंग परवाना चर्चिल ब्रदर्सकडे हस्तांतरित होणार आहे. त्याचबरोबर जमशेदपूर एफसीच्या १२ खेळाडूंचे आणि दोन प्रशिक्षकांचे करार १ सप्टेंबर २०२६ पासून चर्चिल ब्रदर्सकडे वर्ग केले जाणार आहेत. त्यामुळे या खेळाडू आणि प्रशिक्षकांना ‘आयएसएल’मध्येच व्यावसायिक फुटबॉल सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
टाटा स्टीलने यापूर्वीच ३१ जुलै रोजी जमशेदपूर एफसी आगामी २०२६-२७ ‘आयएसएल’ मोसमात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते. व्यावसायिक क्लबच्या मालकीतून माघार घेत असली तरी कंपनीने तळागाळातील आणि युवा फुटबॉल विकासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः टाटा फुटबॉल अकादमीच्या माध्यमातून युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचे काम सुरूच राहणार आहे.
चर्चिल ब्रदर्स संघाला आयएसएल सहभागासाठी ‘एआयएफएफ’कडे १.१ कोटी रुपये शुल्क भरावे लागेल. त्यानंतर त्यांचा आयएसएल सहभाग निश्चित होईल. जमशेदपूर एफसीसाठी अगोदर ३१ जुलैपर्यंत ५५ लाख रुपयांचा पहिला हप्ता भरणे आवश्यक होते. त्याच दिवशी या संघाने आयएसएल स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते.
अखेर स्वप्नपूर्ती!
१९८८ मध्ये स्थापन झालेल्या आणि गोव्यातील फुटबॉलमधील ऐतिहासिक वारसा असलेला चर्चिल ब्रदर्स संघ तब्बल १४ वर्षांनंतर भारतीय फुटबॉलच्या सर्वोच्च पातळीवर खेळणार आहे. त्यामुळे आगामी आयएसएल स्पर्धेत एफसी गोवा व चर्चिल ब्रदर्स असे गोव्यातील दोन संघ असतील. ‘‘तब्बल १४ वर्षांची प्रतीक्षा खडतर होती; मात्र सर्वोच्च स्तरावर पुन्हा खेळण्याचे स्वप्न क्लबने कधीही सोडले नाही,’’ असे चर्चिल ब्रदर्सने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
२०१२-१३ मध्ये चर्चिल ब्रदर्सचे आय-लीग विजेतेपद दुसऱ्यांदा मिळविले होते. त्यापूर्वी त्यांनी २००८-०९ मध्येही आय-लीग स्पर्धा जिंकली होती. संघाच्या प्रवासात क्लबचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वालंका आलेमाव यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे आणि क्लबप्रती दाखविलेल्या बांधिलकीचे संघाने कौतुक केले आहे.
आयएसएल प्रवेशासाठी संक्रमण प्रक्रिया सुलभ केल्याबद्दल अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचेही (एआयएफएफ), जमशेदपूर फुटबॉल अँड स्पोर्टिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकी हक्काच्या हस्तांतरणासह आयएसएलचे क्रीडा परवाना, खेळाडू आणि प्रशिक्षक सोपविण्याची संधी दिल्याबद्दल टाटा स्टील आणि जमशेदपूर एफसीचेही क्लबने आभार मानले आहेत.
चर्चिल ब्रदर्स संघ आयएसएल स्पर्धेत खेळावे हे आपल्या वडिलांचे (चर्चिल आलेमाव) स्वप्न होते, ते आता प्रत्यक्षात येत आहे. संघात अधिकांश गोमंतकीय फुटबॉलपटूंना प्राधान्य दिले जाईल. वडिलांच्या इच्छेनुसार आम्हाला (फातोर्डा) स्टेडियमवर लोकांना मोठ्या प्रमाणात आणायचे आहे, असे संघाच्या सीईओ वालंका आलेमाव यांनी म्हटले आहे.
आयएसएल प्रवेशाची ‘टाईमलाईन’
एप्रिल २०२५: ‘एआयएफएफ’कडून चर्चिल ब्रदर्स आय-लीग विजेते घोषित, आयएसएल पदोन्नतीचा मार्ग मोकळा, ‘एआयएफएफ’च्या भूमिकेवरून वाद
एप्रिल-जुलै २०२५: चर्चिल ब्रदर्सला विजेते घोषित करण्याचा निर्णय इंटर काशी संघाला अमान्य, स्वित्झर्लंडस्थित कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (सीएएस) येथे अपील
१८ जुलै २०२५: ‘सीएएस’कडून इंटर काशीला आय-लीग विजेता घोषित करण्याचे ‘एआयएफएफ’ला निर्देश
जुलै २०२५: इंटर काशी आयएसएल स्पर्धेत पदोन्नती, चर्चिल ब्रदर्स द्वितीय श्रेणी लीगमध्ये (पूर्वाश्रमीची आय-लीग) कायम
फेब्रुवारी २०२६: ‘एआयएफएफ’कडे आयएसएल प्रवेशासाठी चर्चिल ब्रदर्सचा अर्ज, ‘एआयएफएफ’ने मागितली सहभागी आयएसएल क्लबांची मते
२६ फेब्रुवारी २०२६: एफसी गोवा आणि स्पोर्टिंग क्लब दिल्ली यांचा अपवाद वगळता इतर १२ आयएसएल क्लबांचा चर्चिल ब्रदर्सच्या थेट प्रवेशास विरोध
फेब्रुवारी-मार्च २०२६: चर्चिल ब्रदर्सची द्वितीय श्रेणी इंडियन फुटबॉल लीग (आयएफएल) स्पर्धेतून माघार, परिणामी २०२६-२७ साठी आय-लीग २ मध्ये रवानगी करण्याचा ‘एआयएफएफ’चा निर्णय
३१ जुलै २०२६: टाटा स्टीलकडून जमशेदपूर एफसीचा २०२६-२७ आयएसएलमधून माघारीचा निर्णय
१४ ऑगस्ट २०२६: टाटा स्टीलकडून ‘जेएफएसपीएल’मधील १०० टक्के हिस्सा चर्चिल ब्रदर्सकडे १०० रुपयांत हस्तांतरित करण्यास मंजुरी, यामध्ये आयएसएल स्पोर्टिंग परवाना समाविष्ट आणि आयएसएल प्रवेशास बळ
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.