Goa: सतरा वर्षांपूर्वी राज्यात खळबळ माजवून दिलेल्या मंदार सुर्लकर खूनप्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा झालेल्या चार आरोपींनी मुदतपूर्व सुटकेसाठी सादर केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळली होती.
त्याला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिकेद्वारे आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यालयालयाचा निवाडा ग्राह्य धरून आरोपी रोहन धुंगट, नफियाझ शेख, शंकर तिवारी व जोवितो पिंटो या चौघांची याचिका फेटाळली.
2005 साली या चार आरोपींनी 50 लाखांच्या खंडणीसाठी मंदार सुर्लकर याचे अपहरण करून खून केला होता. तत्कालिन पोलिस अधिकारी महेश गावकर यांनी पाचजणांना अटक केली होती. त्यापैकी एकाला माफीचा साक्षीदार ठरवण्यात आल्याने या चौघांना सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली होती.
त्याला उच्च न्यायालयात चौघांनी शिक्षेला आव्हान दिले होते तरी ते फेटाळण्यात आले होते. सर्व आरोपी पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. शिक्षा झाल्यानंतर ते अनेकदा पॅरोल तसेच फरलोगवर कारागृहाबाहेर विविध कारणे देऊन आले आहेत. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींना कारागृहातील 14 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कारागृहातील सुधारणेवरून पूर्वसुटकेसाठी अर्ज करता येतो. त्यासाठी गृह खात्यासह मुख्यमंत्री तसेच राज्यपालांची मान्यता असावी लागते.
कारागृहात 14 वर्षे पूर्ण झालेल्या काही आरोपींच्या पूर्वसुटकेसाठी गृह खात्याने काही आरोपींची नावे निवडली होती, त्यामध्ये या चौघांचा समावेश होता. या नावांचा गृह खात्याच्या समितीसमोर ती आली असता ती फेटाळण्यात आली होती.
आरोपींना 2005 पासून 14 पेक्षा अधिक वर्षे झाले असली तरी ते अनेकदा पॅरोल व फरलोगवर कारागृहाबाहेर राहिले आहेत. तुरुंग कायद्यानुसार पॅरोल व फरलोगवर असलेले दिवस हे त्यांच्या शिक्षेमध्ये समाविष्ट करता येत नाहीत.
त्यामुळे या आरोपींचे पॅरोल व फरलोगचे दिवस वजा केले असता त्यांना कारागृहातील 14 वर्षे पूर्ण होत नसल्याचे कारण देऊन त्यांची नावे वगळण्यात आली होती. त्याला या चौघांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने तुरुंग कायद्याच्या मुद्यावरच त्यांच्या आव्हान याचिका फेटाळल्या होत्या.
...तर आरोपींना धाक राहणार नाही’
सर्वोच्च न्यायालयाने या चौघा आरोपींच्या आव्हान याचिका फेटाळताना म्हटले आहे की, पॅरोल व फरलोगचा आरोपींच्या शिक्षेत समाविष्ट केल्यास काही वजनदार व्यक्ती कारागृहात राहण्यापेक्षा पॅरोल किंवा फरलोगवर बाहेरच राहतील.
त्यामुळे शिक्षेला अर्थच उरणार नाही व धाकही आरोपींना राहणार नाही. पॅरोल व फरलोग वगळता या आरोपींनी 11 ते 12 वर्षे कारागृहातील शिक्षा पूर्ण केली आहे. त्यामुळे त्यांचा पूर्वसुटकेसाठी विचार न करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.