पणजी: गोव्यात निर्माण झालेल्या पायाभूत सुविधा पाहता लवादांच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील आर्थिक केंद्र बनण्याची क्षमता या राज्यात आहे. गोव्याच्या विकासाने मला प्रभावित केले आहे. हे छोटे राज्य प्रगतशील विकासाबरोबर जलद आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या मार्गावर आहे, असे न्या. चंद्रचूड म्हणाले. मेरशी येथे उभारलेल्या उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात पक्ष्यांना पाणी पिता यावे यासाठी लहान-लहान भांड्यांमध्ये पाणी भरून ठेवण्यात येते. हे पक्षी त्यातील पाणी एक-दोन थेंब किंवा आपल्या गरजेनुसार पितात. त्यासोबतच एकदा दिल्लीतील माझ्या शासकीय निवासस्थानी संगणकावर काम करत असताना एका पाखराला शेवग्याची शेंग फोंडून आपल्या भुकेपुरता गर खाताना पाहिले. यावरून मला जाणले की, प्राणी-पक्षी हे आपल्या गरजेनुसार निसर्गातून घेतात. ते मनुष्याप्रमाणे भविष्याची चिंता करत नाहीत. मनुष्यालादेखील तसेच स्वच्छंदी जगता आले पाहिजे, असे विचार सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मांडले.
जिल्हा न्यायालयाची इमारत उभारणीला विलंब झाल्याचा उल्लेख करीत न्या. चंद्रचूड पुढे म्हणाले, कोविडच्या संकटामुळे ही इमारत पूर्ण करण्याचा कालावधी 2021 पर्यंत होता. सरकारने अखेर सप्टेंबर 2024 मध्ये हा प्रकल्प पूर्ण केला. सर्वांच्या मदतीने मॉडर्न न्यायालयाची उभारणी झाली आहे. आधुनिकता या न्यायालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या इमारतीप्रमाणेच अद्ययावत जिल्हा न्यायालयाची इमारत उभारली गेल्याचे स्पष्ट दिसून येते.
मी माझ्या पत्नीमुळे आयुर्वेदिक जीवनशैलीकडे वळलो. त्यामुळे तिचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. मी व्हिगन आहाराचे सेवन करतो. व्हिगन आहाराने मला निसर्गाजवळ जायला शिकविले. निसर्ग हा सर्वोच्च असून आपण त्याचा जवळ असणे, त्याचे महत्त्व जाणणे गरजेचे असल्याचे न्या. चंद्रचूड यांनी सांगितले. बऱ्याच कालावधीनंतर तयार झालेली जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत अखेर कार्यान्वित. मेरशी रस्त्याच्या बाजूला जॅक सिकेरा यांच्या पुतळ्यापासून न्यायालयाच्या इमारतीपर्यंत नेण्यासाठी सहा आसनी रिक्षाची सोय.
न्यायदेवतेच्या मूर्तीची रचना सर्वोच्च न्यायालयाने बदलली आहे आणि ती नव्या अवतारात आली आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यांवर यापूर्वी असणारी पट्टी न्यायाच्या निष्पक्षतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी समजली जात होती. आताचा नवा अवतार हा ‘कायदा आंधळा नाही; तो सर्वांना समानतेने पाहतो,’ असा आहे. समानता हीच समाजासाठी महत्त्वाची आहे.
न्यायालयीन अकादमीची स्थापना झाल्यास तेथे न्यायाधीश, सनदी अधिकारी, पोलिस व संबंधितांना प्रशिक्षण द्यावे. जागतिक व्यावसायिक लवाद म्हणून विकसित झाल्यास गोवा जागतिक आर्थिक हब म्हणून उदयास येईल. भारतीय न्यायव्यवस्थेचा कणा म्हणजे कनिष्ठ स्तरावरील न्यायालये आहेत. तिथे न्यायदान जलदगतीने व्हावे. त्यासाठीच उत्तम पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे.
प्रशासकीय आस्थापनांतील काही सदस्य महिलांबद्दल अपमानास्पद भाषा वापरत असल्याच्या महिला न्यायिक अधिकाऱ्यांच्या तक्रारींबद्दल चिंता वाटते. त्यामुळे विशेषत: महिलांबद्दल सर्वप्रकारच्या अपमानास्पद भाषेला आपल्यामध्ये स्थान नसावे, हे लक्षात घ्यावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.