
पणजी: डिसेंबर अखेरीस धारगळ येथे झालेल्या सनबर्न महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील २६ वर्षीय करण कश्यप या तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेला सहा महिने उलटून गेल्यानंतर हल्लीच पेडणे पोलिसांना त्याच्या मृत्यूसंदर्भातील न्यायवैद्यक अहवाल (एफएसएल) मिळाला आहे.
या अहवालाबाबत फॉरेन्सिक मेडिसीन डॉक्टरांनी मत नोंदविल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. प्रथमदर्शनी या अहवालानुसार विविध ड्रग्स व मद्याच्या मिश्रणामुळे हा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
करण हा मित्रांसोबत धारगळ येथील ईडीएम महोत्सवासाठी आला होता. पहिल्याच दिवशी तो ट्रान्स म्युझिकची मजा घेत असताना तो अचानक कोसळला. म्हापसा उपजिल्हा इस्पितळात नेले असता त्याला मृत घोषित केले होते.
उत्तरीय तपासणी केली असता, त्याच्या रक्ताच्या नमुन्यात किमान चार ते पाच वेगवेगळे ड्रग्सचे कण आढळले होते. त्यामध्ये फेंटानिल (वेदना कमी करण्यासाठी), बेंझोडायझेपाईन (नैराश्य आणणारे औषध), ॲम्फेटामाईन (उत्तेजक) आणि मेथाम्फेटामाईन (मनोरंजक किंवा कार्यक्षमता वाढविणारे औषध) तसेच मद्य आढळून आले. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा प्रथमदर्शनी निकर्ष काढण्यात आला होता.
करणचा व्हिसेरा (आतड्याचा नमुना) जानेवारी २०२५ मध्ये तपासणीसाठी वेर्णा येथील फॉरेन्सिक सायंटिफिक लॅबोरेटरीकडे पाठविला होता. काही दिवसांपूर्वी हा अहवाल मिळाला. लवकरच हा अहवाल डॉक्टरांकडे पाठवण्यात येईल. करणच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरणार आहे. त्याच्या मित्रांच्या जबान्या पोलिसांनी त्यावेळी नोंदवल्या होत्या. त्यातून त्याने ड्रग्स आणि मद्य घेतल्याचे समोर आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.