पणजी येथील 'सुनापरांत सेंटर फॉर आर्ट्स' मध्ये (Sunaparanta Goa Centre for the Arts) सुरू असलेले 'अर्-क्वाइव्ह' (ArQhive): 'अर्ली मॉडर्न कंटेम्पररी व्हिजन' (Early Modern Contemporary Vision) हे कला प्रदर्शन समकालीन कलेच्या माध्यमातून १६व्या आणि १७व्या शतकातील गोव्याच्या इतिहासाचा बौद्धिक माग घेते. दृश्य माध्यमातून आकर्षक कथन करणारा हा अनोखा आर्ट शो कलाकार, इतिहासकार आणि पुरालेखशास्त्रज्ञ यांच्यामधील सहयोगातून निर्माण झालेला आहे.
या कलाप्रदर्शनातील कलाकृती गोवा, आशिया आणि आफ्रिकेतील दैनंदिन जीवनाचे चित्रण करणाऱ्या कोडेक्स कॅसेनाटेन्स (Codex Casanatense) सारख्या संग्रहातून प्रेरणाघेणाऱ्या आहेत. मॅन्युअल गुदिन्हो डी एरेडिया यांचे गंगेच्या खोऱ्यातील भारतीय झाडे आणि वनस्पतींचा सारांश (१६१२) आणि अंतोनिओ बोकारो यांचे आफ्रिका आणि भारताच्या किनारी भागांचे वर्णन करणारी पुस्तके यांचा संदर्भ या प्रदर्शनात मांडलेल्या कलाकृतींमागे आहे.
समकालीन कलेच्या संदर्भात, साहित्याचा अभ्यास करण्याचा हा पहिला एकत्रित प्रयत्न आहे असे म्हणायला हरकत नाही. पुराभिलेख संग्रह आपल्याला वर्तमान जीवनासंबंधी विचार करण्यास आणि त्यांचा अर्थ लावण्यास मदत करतात. वरील पुस्तकांमध्ये चित्रित केलेल्या समृद्ध जैवविविधतेच्या वर्णनातून कलाकारानी प्रेरणा घेऊन आपल्या कलाकृती तयार केल्या आहे.
आशिष फळदेसाई यांच्या जलरंगातून निर्माण झालेल्या चित्रांमधून गोव्याच्या निर्मळ खजान प्रदेशांचे पर्यावरणीय महत्त्व आपल्या लक्षात येते. केग डिसौजा आपल्या स्टेन्ड ग्लास कलाकृतीतून चर्चच्या खिडक्यांवरची आकर्षक जैवविविधता जिवंत करतो. आसावरी गुरव यांचे उल्लेखनीय 'नोट्स इन टाईम', सतीची प्राचीन परंपरा आणि त्यातील त्यागाची संकल्पना मांडते.'द वेडिंग एट हार्मुझ- टर्निंग वॉटर इंटू स्लाईटली वॉर्मर वॉटर' हे ससा आणि कोल्ह्याचे विलक्षण मिलन दर्शवते.
साहिल नाईक यांचे 'डिस्टन्स व्हिस्पर्स अँड ल्युसिड ड्रीम्स', गोवा (Goa),महाराष्ट्र आणि गुजरात मधील धार्मिक स्थापत्य कला तसेच गोव्यातील चर्चच्या वेदीवर आणि दरवाजांवर कोरलेल्या स्थानिक वनस्पतींच्या कोरीव कामातून प्रेरित झाले आहे. उरिएल ओर्लोव 'मॅंगोज ऑफ गोवन ओरिजिन' मधून गोव्यातील वीस स्वादिष्ट जातींच्या आंब्याच्या प्रिंट्स सादर करते. त्या प्रत्येकावर त्याच्या नावाचे पहिले अक्षर २० भाषांच्या वेगवेगळ्या लिपीमध्ये (अरेबिक ते देवनागरी आणि कन्नड ते सीरयाक) लिहिले गेले आहे.
विजय भंडारे यांचे 'गोवा डोराडो' तत्कालीन कालखंडातील सामाजिक आणि आर्थिक उलाढालीचे चित्रण करते, ज्यात त्याचा उदय आणि अस्तंगत होण्याचा समावेश आहे. प्रसिद्ध चित्रकार विराज नाईक ची ' डायलॉग्स बिटवीन द टू' ही मालिका लाकडी हस्तलिखितांच्या संकल्पनेचे पुनरूज्जीवन जुन्या तंत्र आणि रुपकांमधून करते.
मर्यादित साधनांमुळे लुप्त झालेल्या ऐतिहासिक स्त्रोतांमध्ये स्वारस्य निर्माण करण्यासाठी हे कला प्रदर्शन खचित पाठबळ देणारे आहे. हे प्रदर्शन २ नोव्हेंबर २०२४ पर्यंत चालणार असून ते सर्वांसाठी खुले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.