
Amit Palekar Allegation About Suleman Khan Viral Video
पणजी : जमीन हडप प्रकरणातील संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याच्या व्हिडिओसंदर्भात आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष तसेच निमंत्रक ॲड. अमित पालेकर यांची आज जुने गोवे पोलिसांनी सुमारे दोन तास चौकशी केली. मात्र त्यातून पोलिसांच्या हाती काहीच ठोस माहिती लागू शकली नाही. दरम्यान, मला साक्षीदार म्हणून पोलिसांनी नोटीस पाठविली, मात्र एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक दिली, असा आरोप पालेकर यांनी केला.
पोलिसांसमोर जबानी नोंदवल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ॲड. अमित पालेकर म्हणाले की, ज्याप्रमाणे पोलिसांनी सिद्दीकीच्या पहिल्या व्हिडिओसंदर्भात चौकशी केली, त्याच धर्तीवर दुसऱ्या व्हिडिओचीही चौकशी व्हायला हवी. सिद्दीकीला दोन दिवसांपूर्वी केरळमध्ये अटक झाली होती तर हा व्हिडिओ त्याने केव्हा काढला? गोव्यात तो कसा पोहोचला? कोणाला तो पाठवण्यात आला? कोणी तो समाजमाध्यमांवर व्हायरल केला? याची चौकशी पोलिसांनी करावी.
मी जुने गोवे पोलिस स्थानकात चौकशीसाठी उपस्थित होतो, त्याचवेळी सिद्दीकीचा माझ्यावर आरोप करणारा दुसरा व्हिडिओ कसा काय व्हायरल होतो? त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सिद्दीकी याच्या अटकेची घोषणा करतात, हे सर्व काही पूर्वनियोजित होते असे वाटते. अटकेनंतरच त्याच्यावर दबाव आणून त्याला दुसरा व्हिडिओ काढण्यास लावला आहे. त्यात सिद्दीकी हा चष्मा लावून त्याला दिलेले स्क्रिप्ट वाचत असल्याचे दिसत आहे.
त्याने पहिला व्हिडिओ १५ डिसेंबरला पाठवला होता तर त्याने दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा संदर्भ देताना १७ डिसेंबरला पाठवला असे म्हटले आहे. या तारखेत विसंगती आहे. पहिल्या व्हिडिओत त्याने पोलिसांवर आरोप केले होते. दुसरा व्हिडिओ काढून भाजपने आपली प्रतिमा स्वच्छ करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही चौकशी स्वतंत्र यंत्रणेमार्फत व्हायला हवी, असे पालेकर म्हणाले.
सिद्दीकीला मी कधी भेटलेलो नाही. त्याने पहिला व्हिडिओ पाठवला तेव्हा मी गोव्याबाहेर होतो. त्यामुळे तो मी पोलिस महासंचालक तसेच समाजमाध्यमांना देण्यासाठी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षांना पाठविला होता. विरोधकांना चौकशीसाठी बोलावून त्यांची नाहक सतावणूक करून त्यांचा आवाज दडपण्याचा हा प्रकार आहे. सरकारकडून सुडाचे राजकारण सुरू आहे. मात्र न घाबरता लढा सुरूच ठेवू.
अमित पालेकर, (‘आप’)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.