महागाईने केला दिवाळीचा ‘गोडवा’ कमी!

सणात गोडधोड पदार्थ बनविण्यासाठी साखर आणि गुळाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पण, सध्याच्या महागाईमुळे सणाचा गोडवाच जणू गायब झाला आहे.
Sugar and jaggery prices go up on Diwali
Sugar and jaggery prices go up on Diwali Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: एकीकडे गोवेकर नरकासुराला (Narkasur) जाळण्याच्या तयारीत असतानाच दुसरीकडे महागाईच्या भस्मासुराने जणू कहरच केला आहे. ‘दिवाळीचा सण मोठा, नाही उत्साहाला तोटा’ असे म्हटले जात असले तरी महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी (Diwali) यंदा ‘गोड’ नसेल, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.

दिवाळी अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठा सजल्या आहेत. आकाशकंदील, रांगोळी, पणत्या, फटाक्यांसह विविध शोभेच्या वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. दिवाळी म्हटलं की, फराळाची रेलचेल असते. मात्र, गगणाला भिडलेले इंधनांचे दर आणि त्यामुळे वाढलेले गृहोपयोगी साहित्यांचे दर यामुळे सर्वसामान्यांचे जणू कंबरडे मोडले आहे. लोक बाजारात येत असले तरी खरेदीबाबत म्हणावी तेवढी उत्सुकता राहिलेली नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Sugar and jaggery prices go up on Diwali
ऐन दिवाळीच्या तोंडावर नरकासूर जाळला बोर्डे-डिचोलीत सर्वत्र संताप

दिवाळीत विशेषतः मिठाईला अधिक प्राधान्य दिले जाते. पण, 35 रुपये असलेली साखर सध्या तब्बल 42 रुपयांवर पोहचली असल्याने मिठाईचे दरही वाढले आहेत. आधीच कोविड महामारीत व्यवसाय बसला होता. त्यात आता महागाईने ऐन सणासुदीत व्यवसायावर गंडांतर आणले आहे, असे मत एआर स्विट मार्टच्या मालकांनी व्यक्त केले. लोकांनाही दर परवडत नाहीत, त्याचा परिणाम विक्रीवर होत असल्याचे ते म्हणाले. किराणी मालाचे दर वाढत असताना भाजीपाल्यांचे दरही आभाळाला भिडत असल्याने सणाच्या उत्साहावर विरजन पडले आहे. कांदा 50 तर टॉमेटो 60 रुपये प्रति किलो झाला आहे. सणासाठी अत्यावश्‍यक असलेल्या साहित्याचे दरही वाढले असल्याने नागरिक त्रस्त आहेत. बाजारपेठा फुलल्या असल्या तरी नागरिकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे व्यापारीदेखील व्यथीत झाले आहेत. इंधनाचे दर स्थिर न झाल्यास गृहोपयोगी साहित्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी आर. एस. भगत यांनी व्यक्त केली.

साखर-गुळाचा भाव वाढला...

सध्या बाजारपेठेत साखरेचा दर 42 रूपये तर गुळाचा दर 60 रूपये प्रति किलो आहे. सणात गोडधोड पदार्थ बनविण्यासाठी साखर आणि गुळाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पण, सध्याच्या महागाईमुळे सणाचा गोडवाच जणू गायब झाला आहे. भाताच्या पोह्यांचा दर 60 रुपये, साबुदाना पोहे 80 ते 90 रुपये, मका पोहे 80 रुपये, शेंगदाणे 130 रुपये, खाद्यतेल 130 ते 170 रुपये, तुरडाळ 120 रूपये असे सरासरी दर आहेत. सध्या दर स्थीर असले तरी त्यात वाढ होणार नाही, याची खात्री देऊ शकत नसल्याचे व्‍यापाऱ्यांनी सांगितले.

सरकारच्या नावे ‘उद्धार’

काँग्रेस सरकारच्या काळात कडधान्य व इतर वस्तूंचे दरांवरून गोंधळ घालणाऱ्या केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या काळात महागाईने उच्चांक गाठला आहे. जीवनावश्‍यक वस्तू, इंधन, गॅस सिलिंडर आदींवर भरमसाठ दर आकारला जात आहे. आतातर दिवाळीत लागणारे उटणे, आगरवत्ती, धूप हे साहित्यही खूप महागल्याने हे साहित्य खरेदी करताना लोक नाक मुरडत आहेत, अशी माहिती व्यापारी तुकाराम साळकर यांनी दिली. नागरिक गृहोपयोगी एखादी वस्तू कमी खरेदी करतात, मात्र पूजेचे साहित्य खरेदी करण्यात हयगय करीत नाहीत. वाढत्या महागाईमुळे विशेषतः गृहिणींवरील ताण वाढला आहे. त्याबाबत बाजारपेठेत खरेदीदरम्यान महिलांकडून सरकारच्या नावे ‘उध्दार’ सुरू असून, हेच का ‘अच्छे दिन’ असे विचारले जात आहे.

Sugar and jaggery prices go up on Diwali
धनत्रयोदशीचे आगळे-वेगळे स्वरूप

फटाकेही महागले

दिवाळी म्हटलं की फटाके, आकाशकंदिल आणि घर सजावटीचे साहित्य हे समीकरण असते. या साहित्यांचेही दर वधारले आहेत. गणेशचतुर्थीत 72 ते 80 रुपये डझनाने विकल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या माळा आता 120 रुपयांना विकल्या जात आहेत. आकाशकंदीलांचे दर 80 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंत आहेत. गेल्यावर्षी म्हणावी तेवढ्या उत्साहाने दिवाळी साजरी करता आली नव्हती. त्यामुळे यंदा अधिक साहित्य मागविले मात्र अद्याप अपेक्षित व्यापार होत नाही, असे सुचिता देसाई यांनी सांगितले.

बहुतांश वस्तूंचे दर सध्या तरी स्थीर आहेत. पण, त्यात वाढ होणार नाही याबाबत खात्री नाही. कारण इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. परराज्यातून आयात सुरळीत झाल्याने दिलासा मिळाला असला तरी महागाईचा फटका ग्राहक आणि व्यापाऱ्यांना सारखाच बसला आहे.

- ब्रह्मानंद आमोणकर, व्यापारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com