फोंडा : कवळे आणि कुंडई या दोन पंचायती क्षेत्रफळाच्या दृष्टीने लघुत्तम पंचायती. मात्र दोन्ही पंचायती मडकई मतदारसंघात मोडत असल्यामुळे या पंचायतीवर असलेले ‘सुदिनराज’ स्पष्टपणे दिसून येते. कवळे ही पंचायत तशी फोंडा शहराशी निकट असलेली पंचायत. फोंडा नगरपालिकेतील दाग या प्रभागापासून या पंचायतीची हद्द सुरू होते व नंतर ती कवळे देवस्थानपर्यंत जाते. तसेच दुसऱ्या बाजूला यशवंतनगर-तिस्क इथून सुरू झालेल्या या पंचायतीची हद्द साधारणपणे बायथाखोल - बोरीपर्यंत संपते.
मडगाव-फोंडा हमरस्ता हा ही या पंचायतीत येतो. कवळेपेक्षा ढवळी हा भाग सध्या महत्त्वाचा ठरत आहे. ढवळी भागात अनेक सदनिका व बंगले अस्तित्वात आल्यामुळे कवळे पंचायतीत सध्या ढवळीचेच वर्चस्व दिसून येते. तसेच पाटणतळी आमराई कॉलनीचा अर्धा भागही कवळेत येतो. ही पंचायत तशी संपन्न नसली तरी या पंचायतीत काही आस्थापने तसेच कवळेतील देवस्थान येत असल्यामुळे ही पंचायत थोडीफार संपन्नवस्थेत दिसते. रामनाथीच्या हद्दीवर म्हणजेच बांदोडा पंचायतीच्या सुरवातीला या पंचायतीची हद्द संपते.
राजेश कवळेकर हे या पंचायतीचे दीर्घकालीन सरपंचपद भूषविलेले व्यक्तिमत्त्व. कवळेकर हे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. सध्या या पंचायतीत अनेक इच्छुक उमेदवार बाशिंग बांधून तयार आहेत. आता अर्ज भरायला फक्त तीन दिवस राहिल्यामुळे या उमेदवारांची लगीन घाई सुरू झाली आहे. या पंचायतीत नऊ प्रभाग येत असून हे प्रभाग तुलनेने बरेच लहान दिसतात. पण तरीही इच्छुकांची चढाओढ सुरू झाली आहे.
कुंडई पंचायतीतही सुदिन यांचेच वर्चस्व राहिले आहे. कुंडईची हद्द ही पणजी-फोंडा हमरस्त्यापासून सुरू होऊन साधारण मानसीपर्यंत संपते. एका बाजूला मडकईची हद्द तर दुसऱ्या बाजूला कुंकळ्ये - वेलिंग - प्रियोळ या पंचायतीची दिसते. तशी ही पंचायत विशेष संपन्न नसली तरी या पंचायतीत प्रसिद्ध कुंडई औद्योगिक वसाहतीचा भाग येतो. कुंडई हद्द संपली की दुसऱ्या बाजूला भोम-अडकोण पंचायतीची हद्द सुरू होते. मडकई पंचायतीत सात प्रभाग असून प्रशासक नेमण्यापूर्वी विश्वास फडते हे या पंचायतीचे सरपंच होते. तत्पूर्वी रामू नाईक यांनी या पंचायतीचे सरपंचपद अधिक काळ भूषविले आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इतर पंचायतीप्रमाणे कवळे व मडकई पंचायतीतही आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा ठरू लागला आहे. या आरक्षणामुळे काही इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली असून खासकरून इतर मागासवर्गीयांकरिता आरक्षित केलेल्या प्रभागांनी अनेकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. खरी स्थिती ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतरच स्पष्ट होऊ शकेल.
आरक्षणामुळे काहींचे पत्ते कट्ट होण्याच्या मार्गावर असले तरी प्रभागांची अदलाबदल करण्याचे तसेच आपल्या जागी आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. पण, काही झाले तरी या पंचायतीत सुदिनांची मर्जी चालणार हे निश्चित आहे. त्यामुळे कोणी किती हातपाय मारले तरी सुदिनांना हवे तसे होणार असेच चित्र सध्या तरी कवळे व मडकई पंचायतीत दिसते आहे. आता ‘सुदिनांची मर्जी’ कोणावर बसते याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.