St. Francis Xavier DNA Controversy: पोलिसांची शोध मोहीम संशयाच्या घेऱ्यात! वेलिंगकरांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी

Subhash Velingkar Case: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांसंदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद होऊन ६ दिवस उलटले तरी पोलिसांना सुभाष वेलिंगकर सापडलेले नाहीत.
Subhash Velingkar
Subhash VelingkarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांसंदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद होऊन ६ दिवस उलटले तरी पोलिसांना सुभाष वेलिंगकर सापडलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या एकूण शोध मोहिमेबाबतच संशय येऊ लागला आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आटापिटा चालविला असला, तरी त्यांना अद्याप यश आलेले नाही. शोधकार्यासंदर्भातही पोलिस माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवरच संशय निर्माण झाला आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर प्रा. वेलिंगकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज ( १० ऑक्टोबर) खंडपीठाने सुनावणी ठेवली आहे.

राज्यात घडणाऱ्या कोणत्याही गुन्ह्याचा २४ तासांच्या आत छडा लावणाऱ्या पोलिसांना गेल्या शुक्रवारपासून सुभाष वेलिंगकर सापडत नाहीत की, त्यांना अटक करायची नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिसांनीही तपासकामाची माहिती देण्याबाबत कानावर हात ठेवले आहेत.

दक्षिण गोव्यातील आंदोलन मागे घेतल्यापासून पोलिसांची तपासकामाची गतीही मंदावली आहे. मात्र, शोधमोहीम सुरू असल्याचा दावा पोलिसांकडून वारंवार केला जात आहे. वेलिंगकर यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर पोलिसांनी देखरेख ठेवली आहे. मात्र, अद्याप कोणतेच धागेदोरे हाती लागलेले नाहीत.

वेलिंगकर यांच्यातर्फे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला नव्हता. आज सकाळी ऑनलाईन पद्धतीने तो अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती गोवा खंडपीठासमोर दुपारी १.३० च्या सुमारास ॲड. रोहन देसाई यांनी केली. सत्र न्यायालयात युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील सरेश लोटलीकर पुन्हा बाजू मांडण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांना नोटीस बजावली नसल्याने ते उत्तर देण्यासाठी वेळ घेण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयात हस्तक्षेप अर्ज केलेल्यांना प्रतिवादी केलेले नाही. त्यामुळे तेसुद्धा आज ( १० ऑक्टोबर) हस्तक्षेप अर्ज सादर करण्याची शक्यता आहे.

Subhash Velingkar
St. Francis Xavier DNA Controversy: सुभाष वेलिंगकर गोव्याबाहेर? शक्तीप्रदर्शन करत पोलिसांना शरण येण्याची मोर्चेबांधणी; भूमिगत बैठका सुरु!

सत्र न्यायालयाची निरीक्षणे

सेंट झेवियर यांच्या आगामी शवप्रदर्शन उत्सवाच्या तोंडावर त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले असल्याचे दिसून येते.

सुभाष वेलिंगकर यांनी केलेले वक्तव्य अवमानकारक असल्यानेच पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ते वक्तव्य अपमानकारक नव्हते, तर वेलिंगकर यांनी चौकशीला सामोरे जायला हवे होते. पोलिसांच्या अटकेच्या कारवाईला त्यांनी घाबरण्याची गरज नव्हती.

त्यांनी केलेल्‍या वक्तव्याची कबुली दिली आहे. त्यामुळे हे वक्तव्य जाणूनबुजूनच केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

न्यायालयाने आदेशात केलेल्या या निरीक्षणांमुळे वेलिंगकर अडचणीत आले आहेत.

Subhash Velingkar
St Francis Xavier Controversy : गोव्यातील DNA चाचणीचा वाद पोहोचला महाराष्ट्रात; मुंबईतील नागरिकांकडून राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार

महासंचालकही हताश

गुन्हा नोंद झाल्यापासून वेलिंगकर गायब झाले आहेत. पोलिस पथके महाराष्ट्र आणि गोव्यात शोध घेत आहेत. वेलिंगकर यांच्या शोधकार्यासंदर्भात विचारले असता पोलिस महासंचालक आलोक कुमार म्हणाले की, वेलिंगकरांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके गोव्यात तसेच गोव्याबाहेर पाठवली आहेत. मात्र अद्याप त्यात यश आलेले नाही.

डिचोली पोलिसांनी बजावली तिसऱ्यांदा नोटीस

डिचोली पोलिसांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात धार्मिक सलोखा बिघडवल्याच्या प्रकरणात गुन्हा नोंद केला होता. चौकशीसाठी दोनवेळा नोटीस बजावूनही ते उपस्थित राहिले नव्हते. सत्र न्यायालयाने त्यांना या नोटिशीनुसार चौकशीस सामोरे जाण्याचे तसेच तपासकामात सहकार्य करण्याचे निर्देश देऊनही ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तिसरी नोटीस बजावून आज ( १० ऑक्टोबर) सकाळी चौकशीस उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com