
सासष्टी: आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती ९० टक्के होती. काही दिवसांपूर्वी आम्ही व्हॉट्सॲप ग्रुपवरून सर्व पालकांना शाळा सुरू होण्याच्या सूचना दिल्या होत्या. उकाड्याचा प्रश्न आहे; पण आम्ही प्रत्येक वर्गामध्ये पंख्याबरोबरच एअर कुलरची व्यवस्था केली आहे.
गरम व थंड पाण्याची व्यवस्था केली आहे. याकामी आम्हाला फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई याचे सहकार्य लाभले, असे कोकणी भाषा मंडळ संचालित रवींद्र केळेकर ज्ञान मंदिराचे मुख्याध्यापक अनंत अग्नी यांनी सांगितले.
दरम्यान, सोमवार(ता.७)पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. काही शाळांना भेट दिल्यावर व शाळा प्रमुखांकडे चर्चा केल्यानंतर पहिल्याच दिवशी ९० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे व विद्यार्थी तसेच पालकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
सोमवारी मडगावमधील काही शाळा दहा, काही अकरा व काही साडे अकरा वाजता सोडण्यात आल्या. जेव्हापासून सरकारने नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू करण्याची घोषणा केली तेव्हापासून काही पालक व शिक्षकांमध्ये नाराजी पसरली होती. काही पालकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला; पण न्यायालयाने सरकारची बाजू उचलून धरली. तसेच पालकांनीही शिक्षणाला महत्त्व देत आपल्या मुलांना शाळेत पाठविले.
रवींद्र केळेकर ज्ञानमंदिराची विद्यार्थिनी अवनी कामत हिने सांगितले की, शाळा लवकर सुरू झाल्या ते एकप्रकारे चांगलेच झाले. आमच्या शाळेमध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. शिक्षणाबरोबर सामाजिक व सांस्कृतिक विकासावर भर दिला जातो.
कोंबमधील समाज सेवा संघ संचालित महिला व नूतन इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रिचा कामत यांनी सांगितले की, आमच्या शाळेत सहावी ते दहावीचे वर्ग आजपासून सुरू झाले आहेत. त्याचप्रमाणे सर्व वर्गामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ९० टक्केपेक्षा जास्त आहे. मुलांना उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. आज विद्यार्थ्यांना पुस्तकेही वितरित करण्यात आली.
पॉप्युलर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुचित्रा देसाई यांनी सांगितले की, दरवर्षी आमच्या शाळेत दहावीचे वर्ग १ एप्रिलपासून सुरू होतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा प्रश्नच नव्हता. आजपासून सहावी ते नववीचे वर्ग सुरू झाले व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. शाळेत विद्यार्थ्यांची सभा घेतली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम व चिकाटीने अभ्यास करावा व चांगला निकाल देऊन शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले आहे. आज सर्व मुलांना पुस्तकेही वितरित करण्यात आली आहेत.
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) सोमवार(ता.७)पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून, अखेर एकदाची शाळांची घंटा वाजली आहे.
‘एनईपी’अंतर्गत नवीन शैक्षणिक वर्षाचा मुद्दा गेले काही दिवस भलताच चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र, कायदेशीर आदी सर्व अडचणींवर मात करीत आजपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला. भर एप्रिल महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने डिचोलीतील बहुतेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची व्यवस्था म्हणून आवश्यक ती उपाययोजनाही केल्याचे आढळून आले.
नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिलाच दिवस असल्याने बहुतेक विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला त्यांचे पालक सोबत आले होते. त्यामुळे शहरातील सर्व शाळांजवळ विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी दिसून येत होती. शहरातील श्री शांतादुर्गा आणि अवरलेडी हायस्कूलजवळ तर सकाळी मोठी गर्दी दिसून येत होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.