Goa Politics: खरी कुजबुज; पैसा कुणाच्‍या खिशात जातो?

Goa Latest Political News: महानगरपालिका निवडणुकीत भाजप प्रणीत मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील पॅनल उतरले आहे. आज या पॅनलच्या ३० उमेदवारांनी अर्ज सादर केले.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

पैसा कुणाच्‍या खिशात जातो?

राज्‍य सरकार भटक्‍या श्‍‍वानांचा बंदोबस्‍त कधी करणार कुणास ठाऊक! अलिकडेच काकोडा येथे एका दुचाकीचालकाच्‍या समोर एक श्‍‍वान आला आणि अपघात झाला. त्‍यात जखमी झालेल्‍या उत्तम गावकर या ज्‍येष्‍ठ नागरिकाचे इस्पितळामध्ये उपचारादरम्‍यान निधन झाले. लोक भटक्‍या श्‍‍वानांच्‍या मुद्यावर प्रचंड चिडले आहेत. देशातील सर्वोच्च न्यायालयाने फटकारूनही त्‍या संदर्भात ठोस कारवाई होत नसल्‍यास काय म्‍हणावे? कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी लाखो रुपये खर्च होतात, तरीही श्‍‍वानांची संख्‍या वाढते. मग, खर्चाच्‍या नावाने पैसा कुणाच्‍या खिशात जातो?∙∙∙

नवे मार्केट का उभे झाले नाही?

मडगावचे न्यू मार्केट नेहमीच या ना त्या कारणास्तव चर्चेत असते. सध्या म्हणे या मार्केटचे दुरुस्तीकाम सुरू आहे व त्यावर स्थानिक आमदार तथा मंत्री दिगंबर कामत जातीने लक्ष ठेवून आहेत व वेळ मिळेल तेव्हा त्या कामाचा आढवाही घेत आहेत. या मार्केटबाबत म्हणे त्यांना विलक्षण आपलेपणा आहे, असे त्यांचे समर्थक म्हणतात. पण दुसरे असेही काहीजण आहेत व ते म्हणतात की इतका आपलेपणा आहे तर मग हाती मुख्यमंत्रिपद असतानाही त्यांनी या मार्केटचे अत्याधुनिकीकरण का केले नाही, पणजीत पर्रीकरांनी नवे मार्केट उभारले, मुरगाव व काणकोणातही नवीन मार्केटे साकारली केवळ मडगावातच वरचेवर डागडुजी केली गेली. त्याऐवजी नवेच मार्केट उभारले असते, तर अधिक सोयीचे झाले नसते का? असेही ते म्हणतात. ∙∙∙

मंत्री बाबूश आलेच नाहीत!

महानगरपालिका निवडणुकीत भाजप प्रणीत मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील पॅनल उतरले आहे. आज या पॅनलच्या ३० उमेदवारांनी अर्ज सादर केले. महानगरपालिका असो की ताळगाव ग्रामपंचायत बाबूश हे स्वतः उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहत असत. आज मात्र त्यांची अनुपस्थिती दिसून आली आणि त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. महालक्ष्मी मंदिरात उमेदवारांबरोबर ते दर्शनासाठी येतील आणि तेथून ते अर्ज भरण्यासाठी उमेदवारांबरोबर उपजिल्हाधिकारी कार्यालयात जातील, असा कयास गुरुवारी सायंकाळपर्यंत उमेदवारांकडून लावला जात होता. परंतु बाबूश आजारी असल्याने ते येऊ शकले नाहीत, त्यामुळे पक्षाच्यावतीने पॅनलच्या उमेदवारांना घेऊन मंदिरात माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना जावे लागले. बाबूश यांची अनुपस्थिती प्रकर्षाने यावेळी जाणवली, त्यामुळे अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार, त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चा झाल्याशिवाय राहिलीच नाही. ∙∙∙

भाटीकर समर्थकांचा उत्साह

केतन भाटीकर काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याने आता भाजपने रणनीती आखायला सुरवात केली आहे. भाषा सुरक्षा मंच ते मगो पक्ष आणि आता काँग्रेस पक्षाचा प्रवास करताना केतन भाटीकर यांनी कार्यकर्त्यांत मोठी वाढ केली आहे. मागच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाटीकर गटाच्या उमेदवाराने बऱ्यापैकी मते मिळवल्याने भाटीकर समर्थकांचा उत्साहही दुणावला आहे. त्यामुळे आता भाटीकर अर्थातच काँग्रेसला शह देण्यासाठी भाजप काय व्यूहरचना आखते त्यावर सर्व काही अवलंबून आहे. ∙∙∙

चर्चिलचे दोतोरप्रेम

भलेही भाजपचे सरकार वाईट असो. पण मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत हे चांगले माणूस, असे बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव नेहमीच म्‍हणतात. आता वाढीव वीज बिलांवरही बोलताना आलेमाव यांनी, ‘आमचो दोतोर बरो’ असे म्‍हणत लोकांची वीज बिले वाढत असल्‍यामुळे त्‍यांनाही वाईट वाटले असावे, असे म्‍हटले आहे. वीज बिल वाढण्‍यासाठी वीजमंत्री सुदिन ढवळीकर हे कारणीभूत असल्‍याचे म्‍हणतात. सुदिन वीजमंत्री झाल्‍यावरच वीज बिले का वाढू लागली, असा सवाल त्‍यांनी केला आहे. चर्चिल म्‍हणतात त्‍याप्रमाणे दोतोर जर चांगले असतील तर वाढलेली वीज बिले ते कमी का करत नाहीत बुवा? ∙∙∙

Khari Kujbuj
Panaji: पणजीतील 'हा' मार्ग अचानक बंद! वाहतूक वळवली; काय आहे कारण? पहा..

ठाकरेंचा नक्की संदेश काय?

सध्या पणजी महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे पणजीतील राजकीय वातावरण ढवळून निघायला हवे होते, पण तसे काही झालेले नाही. उलट राजकीय वातावरण तापलेय ते फोंड्यातील. अजून फोंड्यातील पोटनिवडणूक जाहीर होणे आवश्यक आहे. तरीही तेथे आता केतन भाटीकर हे पोटनिवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. एका बाजूला पक्षाच्या निष्ठावानास उमेदवारी दिली जाईल, असे पक्षाचे नेते सांगत आहेत. सध्या तेथील निर्माण झालेल्या वादाच्या प्रसंगाला प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पक्षाच्याच कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावर आता गोवा प्रभारी ठाकरे यांनी पक्ष इतर समविचारी पक्षांसोबत मिळून फोंडा पोटनिवडणूक लढवेल. भाजपला पराभूत करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव इतर पक्षांशी चर्चा करण्यात आणि पोटनिवडणुकीसाठी एकत्रित रणनीती आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी प्रतिक्रिया एका खासगी यूट्यूब चॅनलवर दिली आहे. यावरून काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पाटकरांकडे नेमके काय काम असणार आहे, हे फोंड्यातील अनेकांना समजेनासे झाले आहे म्हणे. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: खरी कुजबुज; ...काँग्रेस उत्‍पलसोबत राहणार?

कुंपणच जेव्हा शेत खाते…

हणजुणेतील कृत्यामुळे पोलिस पुन्हा चर्चेत आले आहेत. पोलिस नियंत्रण कक्षाचा वाहनचालक साईश पार्सेकर याला अपघातग्रस्ताच्या अंगावरील तब्बल ७ ते ८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली, ही घटना केवळ धक्कादायक नाही तर व्यवस्थेच्या नैतिकतेलाच काळीमा फासणारी आहे. २५ जानेवारी रोजी हणजुणे येथे कार झाडावर आदळून गंभीर जखमी झालेल्या जॅस्टर व्हिन्सेंट रॉड्रिग्ज यांना मदतीच्या नावाखाली आझिलो इस्पितळ येथे नेत असताना, जीव वाचविण्याची जबाबदारी असलेल्या हातांनीच त्यांच्या अंगावरील सोन्यावर डल्ला मारल्याचा आरोप आहे. ज्यांनी संकटसमयी आधार द्यायचा, त्यांनीच परिस्थितीचा फायदा घेतल्याचा संशय निर्माण होणे ही कायदा-सुव्यवस्थेसाठी लाजिरवाणी बाब आहे. लोकांच्या सुरक्षिततेचे व्रत घेतलेल्यांकडूनच जर विश्वासघात होत असेल, तर सामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com