वास्को : हरित ऊर्जा कशी निर्माण करणार यावर विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी गोव्यासाठी जे काही लक्ष्य दिले आहे, खास करून हरित ऊर्जा हे लक्ष्य २०३० पर्यंत पूर्णत्वास आणण्याचा संकल्प मुख्यमंत्री प्रमोद सावंत, स्वतः मी आणि कॅबिनेट मंत्र्यांनी केला असल्याचे प्रतिपादन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.
वास्को खारीवाडा फिशिंग जेटी येथे वीज मंत्री सुदिन ढवळीकर, मत्स्य व्यवसाय मंत्री नीळकंठ हळणकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मत्स्य व्यवसाय संचालक शर्मिला मोन्तेरो आदींच्या उपस्थितीत वेलंकिकनी नक्षत्र या मच्छीमार ट्रॉलरवर सौरऊर्जेवर चालणारी कुलर यंत्रणा बसवण्याचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी मंत्री ढवळीकर बोलत होते.
‘गोव्यात पन्नास टक्के वीज निर्मिती ही कोळशामुळे होते. तसेच सगळ्यात जास्त कोळशाच्या विरोधात आवाज मुरगाव तालुक्यातून होतो. आम्हाला २७० गिगावॅट वीज निर्मिती ही कोळशामुळे मिळते, हे लक्षात ठेवणे तितकेच गरजेचे आहे. गोवा राज्य हे प्रत्येक घरात वीज प्रवाह मीटरने देणारे पहिले राज्य ठरते. तसेच पाणी व गावागावात हॉट मिक्स रस्ते देणारे राज्य म्हणून अग्रेसर आहे,’ असे ढवळीकर म्हणाले. तसेच वास्कोची वीज समस्या लवकरच संपुष्टात येणार असल्याचे सांगून मार्च २०२३ मध्ये भूमिगत काम सुरू होणार आहे व ते लवकरच पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही ढवळीकर यांनी दिली.
खारीवाडा जेटीचा प्रश्न सोडविणार : यावेळी अखिल गोवा बोट मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी खारीवाडा जेटी विषयी समस्या मांडल्या. तसेच बोट मालकांच्या समस्यांचे निवारण करण्याचे मागणी मंत्र्यांकडे केली. मच्छीमारी बांधवांना बोट मालकांना सरकारच्या सुविधा पोहोचत नसल्याचे सांगितले. यावर खारीवाडा जेटीचा प्रश्न सोडवण्यासाठी आमचा १०० टक्के प्रयत्न चालू आहे. खारीवाडा जेटी साधनसुविधांयुक्त बांधली जाईल, असे आमदार दाजी साळकर म्हणाले.
मच्छीमारी बोट मालकांनी आपल्या समस्या आमच्या पुढे मांडल्या आहेत. खारीवाडा येथे मच्छीमारी जेटी बांधण्याचा प्रयत्न करणार. मच्छीमारांसाठी सरकारी योजना आहेत त्या घेण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. वास्को जेटीचा प्रश्न आहे तो सोडवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे.
- नीळकंठ हळर्णकर, मत्स्यव्यवसाय मंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.