
डिचोली: शिरगाव येथील देवी लईराईच्या यात्रेत झालेल्या चेंगरा चेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून, जवळपास ४० ते ५० भाविक जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी डिचोली आरोग्य केंद्र, म्हापसा जिल्हा रुग्णालय आणि गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या दुर्देैवी घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन करुन माहिती घेतली तसेच, याबाबत शोक व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील याप्रकरणी शोक व्यक्त केला आहे.
"गोव्यातील शिरगाव येथे झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल संवेदना. जखमी भाविक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करत आहे", असे शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने याबाबत एक्सवर पोस्ट करण्यात आली आहे.
"गोव्यातील शिरगाव येथील लईराई देवी मंदिरात वार्षिक यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे."
"सर्व शोकग्रस्त कुटुंबांना मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. तसेच, सर्व जखमींच्या लवकर बरे व्हावेत अशी आशा करतो", या शब्दात राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.
लईराईच्या यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत सुर्या मयेकर, (साखळी), आदित्य कवठणकर (१७) व तनुजा कवठणकर (५२, अवचीतवाडो थिवी), यशवंत केरकर (४०, माडेल, थिवी), प्रतिभा कळंगुटकर, (कुंभारजुवे) आणि सागर नंदरगे, (३०, माठवाडा, पिळगाव.) यांचा मृत्यू झाला आहे. ४० ते ५० जण जखमी असून, अद्याप ८ ते १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळीच गोमेकॉत भेट देत जखमींची विचारपूस केली. तर, आरोग्यमंत्री राणे यांनी वैद्यकीय यंत्रणेला अलर्ट राहण्याचे आदेश दिले असून, 104 हा क्रमांक इमर्जन्सी नंबर म्हणून जारी करण्यात आला आहे.
गोव्यातील प्रसिद्ध असलेली देवी लईराईच्या यात्रेला राज्यातून हजारो भाविक हजेरी लावत असतात. याशिवाय शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकातून देखील भाविक येत असतात. शुक्रवारी या यात्रेला सुरुवात झाली होती. दरम्यान, पहाटेच्या सुमारास घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
धोंडांनी केलेल्या घाईमुळे चेंगरा चेंगरी झाल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शीनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सखोल तपासाचे आदेश दिले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.