Goa Liberation : गोव्यात नव्या काबिजादीतील हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती अबाधित कशी राहिली?

पोर्तुगिजांनी नंतरच्या काळात हे आठ तालुके जिंकून घेतल्यामुळे या भागाला ‘नवी काबिजाद’ असे नाव पडले या भूभागावर पोर्तुगिजांनी दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केले.
Portuguese Ira in Goa | Goa Liberation
Portuguese Ira in Goa | Goa LiberationDainik Gomantak

Goa Liberation : नव्या काबिजादीने गोव्यातील साठ ते सत्तर टक्के भूभाग व्यापलेला आहे. गोव्यातील एकूण बारा तालुक्यांपैकी आठ तालुक्यांचा समावेश नव्या काबिजादीत येतो. पेडणे, डिचोली, फोंडा, धारबांदोडा, सांगे, केपे व काणकोण या आठ तालुक्यांचा समावेश नव्या काबिजादीत आहे. जुन्या काबिजादीचे तालुके बार्देश, तिसवाडी, मुरगाव, सासष्टी हे चार तालुके पोर्तुगिजांनी सन 1510 ते 1543 च्या दरम्यान जिंकून घेतले. तसेच पुढे जवळपास अडीचशे वर्षानंतर सन 1763 ते 1785 च्या दरम्यान पोर्तुगिजांनी नव्या काबिजादीचा भाग जिंकून घेतला. पोर्तुगिजांनी नंतरच्या काळात हे आठ तालुके जिंकून घेतल्यामुळे या भागाला ‘नवी काबिजाद’ असे नाव पडले या भूभागावर पोर्तुगिजांनी दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केले.

नव्या काबिजादीच्या इतिहासात आणि जुन्या काबिजादीच्या इतिहासात सांस्कृतिकदृष्ट्या खूप मोठा फरक आहे. पोर्तुगिजांचे राज्य दडपशाहीचे, अन्यायकारी असले तरी त्यांनी नव्या काबिजादीमध्ये जुन्या काबिजादीत जसे पांथिक उन्मादाने अत्याचार केले, तसे नव्या काबिजादीत केले नाहीत. त्यामुळे, नव्या काबिजादीतील हिंदू धर्म, भारतीय संस्कृती अबाधित राहिली. पोर्तुगिजांनी असे नव्या काबिजादीत का केले? त्यामागील पार्श्वभूमी काय होती? याचे उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

सन 1510 ते 1543 च्या दरम्यान पोर्तुगिजांनी गोव्यातील जुनी काबिजाद आदिलशहाकडून जिंकून घेतली. या काळात दक्षिण कोकण व घाट माथ्यावरील प्रदेश हा विजापूरच्या आदिलशहाच्या राज्याचा भाग होता. या काळात नव्या काबिजादीचा विभागही आदिलशहाच्या राज्याचा भाग होता. आदिलशाहीत दक्षिण कोकणातील कुडाळ, गोवा, कारवार हे प्रमुख सुभे होते. कुडाळ सुभ्यात आजच्या गोव्यातील पेडणे, डिचोली, सत्तरी हे तालुके होते. बहुधा बार्देशही असावा. सन 1510 साली पोर्तुगिजांनी गोवा बेट जिंकून घेतला नंतर आदिलशहाने प्रांत गोव्याचे मुख्यालय फोंडा येथे स्थलांतरित केले. त्यामुळे पुढे आदिलशाही व मराठ्यांच्या कागदपत्रांत फोंडा प्रांताचा उल्लेख ‘प्रांत फोंडा मामले गोवा’ असा होऊ लागला.

Portuguese Ira in Goa | Goa Liberation
Goa Liberation : पोर्तुगीजांचे गोव्याच्या जुन्या काबिजादीतील पांथिक अत्याचार

पोर्तुगिजांनी सोळाव्या शतकात जुन्या काबिजादीत हिंदू मंदिराचा विद्ध्वंस सुरू केला तेव्हा अनेक गावांतील हिंदू देवतांच्या मूर्ती गावकऱ्यांनी पोर्तुगिजांची नजर चुकवत लपवत नव्या काबिजादीतील गावामध्ये स्थलांतरित करून सुरक्षित ठेवल्या तेव्हा नव्या काबिजादीचा भाग हा आदिलशाही राजसत्तेचा भाग होता. स्थानिक महसूल अधिकारी हे स्थानिक वतनदार देसाई घराण्यातील होते. अचानक निर्वासित झालेल्या देवतांची मंदिरे त्यांच्या मदतीने आज दिमाखात वैभवसंपन्नतेने उभी आहेत. तरी एकेकाळी या देवतांच्या नशिबी निर्वासितांचे जिणे आले होते. गोव्यात फार मोठा गैरसमज आहे की, देवता नव्या काबिजादीत सावंतवाडकर वा सौंधेकरांच्या राज्यात आणल्या गेल्या. सोळाव्या शतकात सौंधेकरांचा गोव्याशी काडीमात्र संबंध नव्हता आणि सावंतवाडकरांचे तर अस्तित्वच नव्हते. या दोन्ही जहागीरदार व वतनदारांचा गोव्याशी राजकीय संबंध आला तो सतराव्या शतकाच्या शेवटी व अठराव्या शतकाच्या सुरुवातीला. छत्रपती राजाराम महाराजांचे अंकित जहागीरदार म्हणून उत्तर गोव्यातील पेडणे, डिचोली, सत्तरी हे भाग सावंतवाडीकरांना व दक्षिण गोव्यातील फोंड्यासह कारवार अंकोल्याचा भाग छत्रपतींचे जहागीरदार म्हणून.

नव्या काबिजादीत पेडणे, डिचोली सत्तरी हे तालुके सन 1663 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतले. पुढे 1675 मध्ये छत्रपती शिवरायांनी प्रांत फोंडासह कारवार, अंकोला जिंकून घेऊन छत्रपती शिवाजी महाराज हे नव्या काबिजादीचे राजे बनले. येथील रयत ही छत्रपतींची रयत बनली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज हे नव्या काबिजादीचे राजे बनले. सतराव्या शतकाच्या अखेर मोगल व मराठा राजसत्तेचा संघर्ष अत्यंत शिगेला पोहोचला होता. स्वत: औरंगजेब बादशहा सत्तावीस वर्षे दक्षिणेत मराठ्यांची सत्ता नष्ट करण्यासाठी ठाण मांडून बसला होता. अशा काळात राजकारणाच्या प्रचंड उलथापालथी होत होत्या. छत्रपती राजाराम व औरंगजेब बादशहा यांनी स्थानिक वतनदार व जहागीरदार यांना मोठी वेतन देऊ केली होती. मोगल बादशहा औरंगजेबाच्या इस्लामी दहशतवादाला कंटाळून कोकणातील वतनदारांनी ‘छत्रपतीचे राज्य हे देवा ब्राह्मणांचे वसतिस्थान’, असे म्हणत छत्रपतींना साथ दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com