पणजी: सांतइस्तेव येथे कुंभारजुवे नदीत घडलेल्या कार दुर्घटनेतून बचावलेली युवती, तिचे मित्र व तिच्या कुटुंबीयांनी मिळून बाशुदेव भंडारी याला बेपत्ता केले आहे का, या अंगाने तपासकाम करण्याचे आश्वासन उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आदेशानंतर कौशल यांनी बाशुदेवचे वडील नारायण भंडारी यांना आज भेटीसाठी पर्वरी येथील आपल्या कार्यालयात बोलावले होते.
३१ ऑगस्टच्या मध्यरात्री ही घटना घडली होती. युवती पोहून किनाऱ्यावर आली होती तर बाशुदेव बेपत्ता झाला होता. परंतु पोहता येणारा बाशुदेव बुडाला हे मानण्यास त्याचे कुटुंब तयार नाही. त्याचे वडील नारायण व बंधू बलराम यांनी काल मुख्यमंत्र्यांची साखळी येथे भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरील आदेश दिला होता.
त्या युवतीने आपण आधी मद्यपान केले नव्हते अशी जबानी पोलिसांना दिली होती. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मद्यपान करताना दिसत आहे.
कार दुर्घटनेतून बचावलेल्या युवतीच्या उपस्थितीत तिच्या दोघा तरुणांची ओळखपरेड आज न्यायदंडाधिकाऱ्यांनी (मामलेदार) घेतली. माशेल येथे ज्या कारला ठोकर देऊन बाशुदेव पसार झाला होता व त्याच्या कारचा पाठलाग केलेल्या दोघा संशयितांना बोलावण्यात आले होते. या ओळखपरेडचा अहवाल सीलबंद ठेवण्यात आला आहे.
बाशुदेव, ती युवती व तिच्या दोन मित्रांनी हॉटेलमध्ये जेवण घेतल्यानंतर कारमध्ये बाशुदेव होता, याचे पुरावे पोलिसांनी द्यावेत म्हणजे तो बुडाला असे मानता येईल असे नारायण यांचे म्हणणे आहे.
त्या दोन मित्रांनी आपण हॉटेलमधून वसतिगृहात गेल्याचे आधी सांगितले होते तर आता ते आम्हीही कांदोळीला निघालो होतो असे सांगत आहेत.
बाशुदेवच्या प्रेमाला त्या मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळेच तिला गुजरातहून लांबवर गोव्यात शिकण्यासाठी पाठवले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.