तिसवाडी: कुंभारजुवे, मडकई आणि सांतआंद्रे मतदारसंघात असलेला ओफळा– धोंजो आणि कावजो बांध बांधण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे, कारण हा वगळून नागोणजो – खेडो बांध प्रथम बांधल्यास तो कोसळण्याची भीती आहे, परिणामी करदात्यांचे कोट्यवधी पैसे वाया जातील, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
ओफळा – धोंजो आणि कावजो या खाजनांना जोडणारे बांध हळू हळू जीर्ण होऊन कोसळले. त्यामुळे शेकडो एकर खाजन शेती जमीन नदीच्या पात्रात रूपांतरित झाले असून तेथे शेती जमीन होती, यावर विश्वास ठेवणे अशक्य होऊन बसले आहे. हा बांध बांधणे अवघड काम आहे, कारण नदीचा प्रवाह जास्त असल्याने तेथे बार्ज वाहतूक होते. सरकार बांध बांधण्यासाठी खरोखरच गंभीर असेल, तर पारंपरिक बांध बांधकाम करणाऱ्यांना सल्लागार म्हणून नेमले पाहिजे, असे शेतकरी आणि स्थानिकांचे म्हणणे आहे.
ओफळा – धोंजो आणि कावजो बांध कोसळल्यानंतर नागोणजो – खेडो बांध कोसळला, कारण पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे सरकारने प्रथम पारंपरिक बांधाचे बांधकाम करणारे, शेतकरी आणि खाजन जमिनींची समज असलेल्यांचे मत विचारात घेणे आवश्यक आहे. तसेच आधुनिक पद्धतीने बांधकाम करण्याऐवजी पारंपरिक पद्धतीने बांधकाम झाले पाहिजे, तरच बांध दीर्घकाळ टिकणार आहे.
करमळीत येणाऱ्या खोली ओफळा (जुने ओफळा), ओफळा (भाग), कावजो ००.०० ते ३६३० एमएम येथील मानशीची पुनर्बांधणी आणि बांध दुरूस्तीसाठी १७ कोटी, ८२ लाख ४४ हजार ९२६ रुपयांची निविदा मंजूर झाली होती. परंतु मुदत संपल्यानंतर कंत्राटदाराने मुदतवाढ न केल्याने संबंधित खात्याने निविदा रद्द केली आहे.
३६३० ते ६४३० एमएम भागासाठी १९ कोटी ३ लाख ८० हजार ०९० रुपयांची निविदा गोवा राज्य बांधकाम सल्लागार मंडळाकडे (जीएसडब्लूएबी) मंजुरीसाठी पाठवली आहे. आत्तापर्यंत प्रकरण निर्णयासाठी जीएसडब्लूएबी समोर आलेले नाही. एकदा जीएसडब्ल्यूएबीने निविदा मंजूर केल्यानंतर खर्चासाठी पाठवली जाईल.
नागोणजो – खेडो बांधाच्या कामासाठी १३ कोटी ७४ लाख ३१ हजार ९५८ रुपयांची निविदा मंजूर झाली होती, मात्र कंत्राटदाराने मुदतवाढ न केल्याने संबंधित खात्याने रद्द केली आहे, असे उत्तर कृषी खात्याने विधानसभेत विचारल्या गेलेल्या अतारांकित प्रश्नाला दिले आहे.
बांध हे पारंपारिक पद्धतीने बांधल्यास टिकतील, याची प्रचिती लोकांना आली असून सरकारलाही आली आहे. आधुनिक पद्धतीने बांधलेले बांध लगेच कोसळतात. ओफळा – धोंजो, कावजो आणि नागोणजो – खेडो हे बांध एकाच वेळी बांधले पाहिजे, कारण एक बांधून दुसऱ्याचे काम लांबणीवर टाकल्यास त्याचे काम पूर्ण होईल की नाही, असा प्रश्न निर्माण होणार आहे.
राजेश नाईक, पंच सदस्य, करमळी
ओफळा – धोंजो बांध हा महत्त्वाचा असून नागोणजो – खेडो बांधाला हा संरक्षण देतो. आज या बांधाचे अस्तित्व राहिलेले नसून प्रथम त्याची पुनर्बांधणी हाती घेतली पाहिजे. तसेच हे काम अवघड असल्याने सरकारने पूर्वतयारी करूनच कामाची निविदा काढावी.
सुनील नाईक, शेतकरी
तिसवाडीतील खाजन बांधांचे अस्तित्व गेल्याने त्यांची पुनर्बांधणी कोणत्या कारणासाठी रखडली आहे. खासदार सदानंद तानावडे यांनी खाजन जमिनीचा विषय राज्यसभेत मांडून अर्थसाह्याची मागणी केली. त्यांच्या मागणीचे स्वागत आहे, तर प्रथम ओफळा – धोंजो बांधाचे काम लवकरच हाती घेईल.
रामराव वाघ, अध्यक्ष, खाजन एक्शन समिती
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.