Goa SAG: ‘साग’मधील जंगी स्‍वागतामुळे संचालक गावडे वादात, कारणे दाखवा नोटिस; गावडे - तवडकर वादाची चर्चा

Ajay Gaude Sag: क्रीडा खात्‍याच्‍या संचालकासह क्रीडा प्राधिकरणाच्‍या (साग) कार्यकारी संचालकपदाचा अतिरिक्त ताबाही मिळालेले डॉ. अजय गावडे सोमवारच्‍या स्‍वागत समारंभामुळे वादाच्‍या भोवऱ्यात सापडले आहेत.
Ajay Gaude controversy |
Ajay Gaude controversy |Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: क्रीडा खात्‍याच्‍या संचालकासह क्रीडा प्राधिकरणाच्‍या (साग) कार्यकारी संचालकपदाचा अतिरिक्त ताबाही मिळालेले डॉ. अजय गावडे सोमवारच्‍या स्‍वागत समारंभामुळे वादाच्‍या भोवऱ्यात सापडले आहेत.

‘साग’च्‍या कर्मचाऱ्यांनी ढोल वाजवत, पुष्‍पवृष्‍टी करीत तसेच समेळ आणि घुमट भेट देत त्‍यांचे स्‍वागत केल्‍याचे सोशल मीडियावरून झळकताच तीव्र नाराजी व्‍यक्त करीत मुख्‍य सचिव डॉ. व्‍ही. कांदावेलू यांनी डॉ. गावडेंना ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केली आहे. राज्‍यात झालेल्‍या राष्‍ट्रीय क्रीडा स्‍पर्धेपूर्वी डॉ. अजय गावडे क्रीडा खात्‍याचे संचालक म्‍हणून कार्यरत होते.

क्रीडा स्‍पर्धेची तयारी सुरू असतानाच माजी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्‍याशी त्‍यांचे अनेकदा मतभेद झाले. त्‍यामुळे कंटाळलेल्‍या डॉ. गावडेंनी क्रीडा खात्‍यातून बदली करण्‍याची मागणी सरकारकडे केली आणि तेथून बदली करून घेण्‍यातही यश मिळवले. त्‍यानंतर गोविंद गावडेंनी स्‍वत:च्‍या मर्जीतील अरविंद खुटकर यांची क्रीडा संचालकपदी बदली करून घेतली होती.

त्‍यानंतर गत पावसाळी अधिवेशनाच्‍या काही दिवस आधी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पक्षशिस्‍तीचा भंग केल्‍याचा ठपका ठेवत गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळले आणि काही दिवसांपूर्वी रमेश तवडकर यांना मंत्रिमंडळात घेऊन क्रीडा खात्‍याचे मंत्रिपद त्‍यांना बहाल केले, पण त्‍याआधीच सरकारने गावडेंना हटवताच त्‍यांच्‍या विश्‍‍वासातील अरविंद खुटकर यांचीही क्रीडा संचालकपदावरून बदली केली आणि डॉ. अजय गावडेंची पुन्‍हा क्रीडा संचालकपदी वर्णी लावली.

अजय गावडे हे तवडकर यांचे विश्‍‍वासू मानले जात असल्‍याने क्रीडा खाते तवडकर यांनाच मिळेल, याचे स्‍पष्‍ट संकेत मिळाले होते. त्‍यानंतर काही दिवसांतच तवडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि अपेक्षेनुसार क्रीडा खातेही त्‍यांनाच मिळाले.

अशाप्रकारचे स्‍वागत पाहिले नव्‍हते : डॉ. गावडे

‘साग’च्‍या कार्यकारी संचालकपदाचा ताबा घेतल्‍यानंतर डॉ. अजय गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना भावुक प्रतिक्रिया दिली. नागरी सेवेत काम करीत असताना गेल्‍या अकरा वर्षांत आपण सुमारे १५ खात्‍यांचा कारभार सांभाळला आहे, पण अशाप्रकारचे स्‍वागत आपण याआधी पाहिले नव्‍हते. कर्मचाऱ्यांनी आपले ज्‍या पद्धतीने स्‍वागत केले, त्‍यातून त्‍यांचे आपल्‍यावरील प्रेम आणि आपुलकी दिसून आली. या सर्वांना सोबत घेऊन आणि कोणताही भेदभाव न करता आपण काम करू, अशी हमीही त्‍यांनी दिली.

नक्‍की काय घडले?

१ चार दिवसांपूर्वी सरकारने ‘साग’च्‍या कार्यकारी संचालकपदावर असलेल्‍या डॉ. गीता नागवेकर यांची राज्‍य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या सदस्‍य सचिवपदी बदली केली आणि ‘साग’च्‍या कार्यकारी संचालकपदाचा अतिरिक्त ताबा डॉ. गावडे यांच्‍याकडे दिला.

२ त्‍यानुसार गावडे यांनी सोमवारी या पदाचा ताबा स्‍वीकारला, पण ताबा घेण्‍यापूर्वी ‘साग’च्‍या कर्मचाऱ्यांनी ढोल वाजवत आणि पुष्‍पवृष्‍टी करीत त्‍यांचे जल्लोषी स्‍वागत केले.

३ नागरी सेवेतील अधिकाऱ्याचे अशाप्रकारे स्‍वागत झाल्‍याची दखल मुख्‍य सचिव डॉ. कांदावेलू यांनी घेतली आणि तीव्र नाराजी व्‍यक्त करीत त्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसही जारी केली.

Ajay Gaude controversy |
Cricketer Retirement: क्रिकेटपटूची तडकाफडकी निवृत्ती! Asia Cup 2025 पूर्वी 'या' खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला रामराम

तीन दिवसांत स्‍पष्‍टीकरण द्या!

‘साग’च्‍या कार्यकारी संचालकपदाचा ताबा तुम्‍ही ढोलाच्‍या गजरात आणि पुष्‍पवृष्‍टीत स्‍वीकारत असल्‍याचे सोशल मीडियावरून दिसून आले, जे अनावश्‍‍यक होते. नागरी सेवेतील अधिकाऱ्याचे असे वर्तन सरकारी कर्मचाऱ्याला शोभण्‍यासारखे नाही. त्‍यासाठी तुमच्‍यावर शिस्‍तभंगाची कारवाई का करू नये, याचे स्‍पष्‍टीकरण तीन दिवसांत द्यावे, असे निर्देश मुख्‍य सचिव डॉ. व्‍ही. कांदावेलू यांनी ‘कारणे दाखवा’ नोटिशीतून दिले आहेत.

Ajay Gaude controversy |
GST on Sports: क्रिकेट प्रेमींसाठी वाईट बातमी, सामने पाहणं आणखी महाग होणार, तिकिटांच्या किमतींवर इतका GST आकारला जाणार

काही शंका आणि चर्वितचर्वण

माजी क्रीडामंत्री गोविंद गावडे व डॉ. अजय गावडे यांच्‍यात २०२२ पासू‍न मतभेद असल्‍याचे बोलले जात होते. तसेच गोविंद गावडे व विद्यमान क्रीडामंत्री रमेश तवडकर यांच्‍यामधून विस्‍तवही जात नाही, हे सर्वश्रुत आहे.

डॉ. गावडे यांचे झालेले स्‍वागत आणि बजावलेली नोटीस या स्‍थित्‍यंतराला राजकीय किनार असल्‍याची चर्चा सध्‍या रंगली आहे.   समेळ आणि घुमट वादनाने झालेले स्‍वागत नियमबाह्य असल्‍याची तक्रार मुख्‍य सचिवांकडे कुणी केली? गोविंद समर्थकांनी? अशा प्रश्‍‍नांवर दिवसभर चर्वितचर्वण सुरू होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com