फोंडा: ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद म्हाडगुत यांनी लिहिलेल्या ‘शोध सुखाचो’ या कोकणी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला फोंड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विठोबा देवस्थानासमोर झालेला हा प्रयोग शेवटपर्यंत रंगतदार ठरला. हे नाटक ‘शोध सुखाचो’ या सिनेमाचे नाट्यरूपांतर आहे. हे नाटक भूमिपुरुष प्रासादिक नाट्यमंडळाकरिता रंगकर्मी महादेव खानोलकर यांनी निर्माण केले आहे, तर फोंड्यातील एक युवा नाट्यकलाकार नितीन कोलवेकर यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे.
स्वप्नील पारकर यांची प्रकाश योजना, तर सत्यवान शिलकर यांचे ध्वनिसंकलन या नाटकाला लाभले होते. नीलेश पारोडकर यांनी व्यवस्थापनाची बाजू सांभाळली. नाटकात महादेव खानोलकर, चेतना फायदे, अनुराधा प्रभू, दक्षांत पारकर, विश्वजीत सावंत, जीवन बेतकीकर, मिलिंद म्हाडगुत आणि नितीन कोलवेकर यांच्या भूमिकांना प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळाली. या नाटकात माणसाने सुख कसे शोधावे, याचे विवेचन केले आहे. या नाटकाला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून खानोलकर यांनी या नाटकाचे प्रयोग विविध ठिकाणी करणार असल्याचे सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.