
Sunburn Festival 2024 Security
पेडणे/पणजी: सुकेकुळण-धारगळ येथे २८, २९ व ३० डिसेंबर रोजी भरणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलची तयारी अंतिम चरणात आली आहे. आतापर्यंत ७० टक्के काम झाले असून बाकी काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शेकडो कारागीर, मजूर, कंत्राटदार, अभियंते तसेच आयोजक दिवसरात्र झटत आहेत
दरम्यान, सनबर्न फेस्टिव्हल धारगळ येथील महामार्गापासून अंतर्गत मार्गावर होणार असला तरी तेथे वाहतुकीची कोंडी होण्याचे लक्षात घेऊन जागोजागी वाहतूक पोलिस ईडीएम फेस्टिव्हल रात्री उशिरापर्यंत सुरू असेपर्यंत ड्यूटीवर असणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
हल्लीच वाहतूक पोलिस अधिकारी व पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांनी सनबर्न ईडीएम फेस्टिव्हलची पाहणी केली. या पाहणीवेळी आयोजकांनी वाहन पार्किंगसाठी केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. या ठिकाणी ५०० हून अधिक चारचाकी वाहने तसेच दुचाकीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांबरोबर आयोजकांनी स्वतःचे स्वयंसेवक नेमण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे फेस्टिव्हलवेळी वागातोर येथे जी पूर्वी वाहतुकीची कोंडी होत होती ती होणार नाही, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.
फेस्टिव्हलच्या ठिकाणी पोलिस, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठीचे क्रमांकाचा फलकही लावण्यात येईल. त्यामुळे एखाद्याला ध्वनी प्रदूषणसंदर्भात तक्रार द्यायची असल्यास या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येणार आहे. त्या ठिकाणी आवाजाची क्षमता दर्शविणाराही इलेक्ट्रॉनिक फलक असेल व तो संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ऑनलाइन जोडलेला असेल. त्यामुळे या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात बसूनही त्याची माहिती मिळवता येणार आहे.
सुकेकुळण-धारगळ येथे सुमारे ८० हजार चौरस मीटरपेक्षा जास्त जागेत हा फेस्टिव्हल भरणार आहे. येथे येण्यासाठी धारगळ येथील महामार्गाच्या सर्व्हीस रोडपासून फेस्टिव्हलच्या जागेपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. अंतर्गत रस्त्याचे काम अजून बाकी आहे. दर्शनी भाग तयार झाला आहे. तसेच वाहनांसाठी पार्किंग, विविध स्टॉल आदींचे नियोजन केले आहे. प्रखर दिव्यांसाठी टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. दर्शनी भागात पाच रंगमंच उभारण्यात आले असून त्यात एक मोठा रंगमंच आहे. हे मंच तयार झाले असून डेकोरेशनचे काम सुरू आहे. तीन दिवस भरणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये देश विदेशातून हजारो लोक सहभागी होणार आहेत.
ड्रग्ज विक्रीवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष पोलिस पथकेही वाहन पार्किंगच्या भागात तैनात असतील. ड्रग्जची विक्रीवर सनबर्न ईडीएम फेस्टिव्हलच्या आतील आवारात देखरेख ठेवली जाणार आहे. एखादी व्यक्ती ड्रग्जच्या नशेत असल्याचा संशय आल्यास त्याची त्याच ठिकाणी पोलिसांकडून ड्रग्ज तपासणी करण्यात येईल. गेल्यावर्षी सनबर्नसंदर्भात जनहित याचिकेत जे निर्देश दिले आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल असे अधिकाऱ्याने सांगितले.
फेस्टिव्हलवेळी आवाजाची क्षमता वाढणार नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आहे. उल्लंघन झाल्याचे त्यांनी सांगितल्यावर तेथील म्युझिक सिस्टीम जप्त करून कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिस, प्रदूषण मंडळ व उपजिल्हाधिकारी यांची पथके संयुक्तपणे त्यावर देखरेख ठेवणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.