Goa News: सात वर्षीय मुलीचा शांती निकेतन या वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूमुळे सेंट झेव्हियर अकादमी संस्थेची चौकशी सुरू झाली आहे. संस्थेत क्षमतेपेक्षा अधिक मुले असल्याचे उघड झाले आहे. मृत मुलीला अपना घरमधून वसतिगृहात बाल कल्याण समितीशिवाय (सीडब्ल्यूसी) ठेवले होते.
त्यामुळे या प्रकाराची उपविभागीय न्यायदंडाधिकारी, महिला व बाल विकास खात्यामार्फत चौकशी होत आहे. समितीने जुने गोवे पोलिसांना संस्थेविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ही संस्था चौकशीच्या घेऱ्यात सापडली आहे.
शांती निकेतन हे वसतिगृह सेंट झेव्हियर संस्थेतर्फ चालविले जाते. यामध्ये बेघर तसेच विशेष मुलांना ठेवून घेऊन त्यांना शिक्षण दिले जाते. सोमवारी मूळची ओरिसा येथील ग्रेसी नायक हिचा मृत्यू झाल्याने या घटनेबाबत महिला व बाल विकास खात्याने गंभीर दखल घेतली आहे.
वसतिगृहामध्ये ठेवण्यात आलेल्या मुलांचीही माहिती संस्थेने समितीला दिली नाही. त्यामुळे या संस्थेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तक्रार समितीने जुने गोवे पोलिसांना दिली आहे. त्याची दखल घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
प्रकरणाची गंभीर दखल
बाल कल्याण समितीला या प्रकरणाची सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. बाल सरंक्षण विभागही या संस्थेच्या वसतिगृहात असलेल्या मुलांची माहिती तसेच घटना घडलेल्या ठिकाणची माहिती घेणार आहे.
बाल कल्याण समितीने शांती निकेतन वसतिगृहाच्या संस्थेला यापूर्वी अनेकदा ज्युवेनाईल जस्टीस कायद्यानुसार सर्व प्रक्रिया करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही.
जबान्या नोंदवल्या : पोलिसांनी घटनेवेळी उपस्थित असलेल्या वॉर्डन व मदतनिसाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या जबान्या नोंदविल्या आहेत. मयत ग्रेसी हिची जबानी नोंदवण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ती जिवंत असताना डॉक्टरांनी तिच्या वेदनांमुळे जबानी घेण्यास परवानगी दिली नव्हती.
सर्व सोपस्कार केल्यानंतर पोलिसांनी ग्रेसीचा मृतदेह सांज जुझे दी आरियल येथे राहत असलेल्या कुटुंबियाकडे सादर केला. या घटनेने वसतिगृहातील मुले घाबरलेली आहेत. एनजीओच्या मदतीने जुने गोवे पोलिस काही मुलांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संस्थेमधील मुलांची घेण्यात येणारी काळजी याचीही माहिती मिळवली जात असल्याचे पोलिस सूत्राने सांगितले.
वसतिगृहात नियमांचे उल्लंघन
सेंट झेव्हियर अकादमीच्या संस्थेच्या वसतिगृहात असलेल्या मुलांची संख्या ही तेथील क्षमतेपेक्षा अधिक आहे.
त्याव्यतिरिक्त या मुलांवर देखरेख ठेवण्यास असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे.
वसतिगृहात असलेल्या मुलांमध्ये ग्रेसी नायक या मुलीसह आणखी काही विशेष मुले आहेत.
त्यामुळे अनेकदा या कर्मचाऱ्यांचे तेथील मुलांवर त्यांच्या आंघोळीच्यावेळी तसेच इतर कामांकडे दुर्लक्ष होते.
कर्मचाऱ्यांना तेथील मुलांना सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातूनच ग्रेसी या सात वर्षीय विशेष मुलीला जीव गमवावा लागला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.