सुशांत कुंकळयेकर
किनाऱ्यांवरील वाढता गजबजाट आणि पर्यटन व्यावसायिकांचे कासव संवर्धन क्षेत्रावर होणारे अतिक्रमण यामुळे गाेव्यात समुद्री कासवांची पैदास कमी हाेत चालली होती. मात्र, न्यायालयाने केलेला हस्तक्षेप आणि वन खात्याने घेतलेले सुरक्षेचे उपाय याचा चांगला परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. यंदा दक्षिण गोव्यात कासवांच्या पिल्लांची पैदास मागच्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. पर्यावरणप्रेमींसाठी ही खुशखबर ठरली आहे.
दक्षिण गोव्याचे वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटन विभागाचे डेप्युटी कन्झर्व्हेटर अनिकेत गावकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दक्षिण गोव्यात मुख्यत: आगोंद व गालजीबाग या किनारपट्टीवर कासव अंडी घालायला येत असतात. मात्र, यावेळी या दोन्ही ठिकाणांसह तळपण, बेतूल, केळशी आणि उतोर्डा या किनाऱ्यांवरही कासवांनी अंडी घातली. मागच्या वर्षी समुद्री कासवांनी 41 ठिकाणी अंडी घातली होती. यंदा हे प्रमाण 92 वर पोहोचले असून कासव संवर्धनाच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे.
गावकर म्हणाले की, वन खात्याने आता स्वत:चा मरिन विभाग स्थापन केला असून या विभागाचे कर्मचारी कासव संवर्धन क्षेत्रात गस्त घालत असतात. त्याचा चांगला परिणाम झाला असून न्यायालयाच्या आदेशानंतर या भागातील गजबजाटही काही प्रमाणात कमी झाला. असे जरी असले तरी, गालजीबाग किनाऱ्याच्या तुलनेत आगोंद किनारा हा अधिक वर्दळीचा असतानाही आगोंद किनाऱ्यावर कासवांनी अधिक अंडी घातल्याचे दिसून आले आहे. गालजीबाग किनारा हा तुलनेने शांत असूनही तिथे कमी अंडी घातली गेली आहेत. मागच्या काही वर्षांची आकडेवारी तयार करून वन खाते हे बदल का होतात त्यावर अभ्यास करणार आहे.
कासव संवर्धनावर मार्गदर्शन
मंगळवार, 23 रोजी जागतिक कासव संवर्धन दिन साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून सकाळी 11 वाजता गालजीबाग किनाऱ्यावर वन खात्याने जागृती मोहीम करणारा कार्यक्रम आयोजित केला आहे. सभापती रमेश तवडकर यांच्याहस्ते यावेळी कासव संवर्धनात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या स्वयंसेवकांचा सत्कार केला जाणार आहे. कासवाचे संवर्धन चांगल्याप्रकारे कसे करता येते त्यावर यावेळी वन अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
उपलब्धआकडेवारीनुसार
दक्षिण गोव्यात मागच्यावर्षी 4,230 अंडी घालण्यात आली हाेती. त्यातून 3,737 पिल्ले जन्माला आली. तर 493 अंडी फोल ठरली.या आकडेवारीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत 9,355 अंडी घातल्याचे दिसून आले असून आतापर्यंत त्यातून 6,868 पिल्ले जन्माला आली व त्यांना पाण्यात सोडण्यात आले.
उत्तर गोव्यातही कासव पैदासीचे प्रमाण वाढले असून यावेळी कांदोळीसारख्या गजबजलेल्या किनाऱ्यावरही कासवांनी अंडी घातली. यावेळचे हवामानही कासवांच्या समागमासाठी पोषक होते. यावेळी पाऊस न पडल्याने मोठ्या प्रमाणावर कासवे किनाऱ्यावर आली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर अंडी घातली. त्यामुळेच ही पैदास दुप्पट झाली.
आनंद जाधव, उत्तर गोव्याचे डेप्युटी कन्झर्व्हेटर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.