फातोर्डा : सोनसोडो कचरा यार्डवर कचरा प्रक्रिया करण्यात येत असलेल्या शेडमध्ये कचरा वाढल्याने या शेड जवळ असलेली भिंत कोसळून पडण्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेने कचरा विल्हेवाटी बद्दलची मडगाव पालिकेची अनास्था पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. एका बाजूचे भिंतीचा कठडा कोसळला असल्याने कचरावाहू ट्रक आणि कोपॅक्टरना नियोजित ठिकाणी कचरा टाकण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे .
भिंत कोसळण्याची घटना शनिवारी सकाळी 7 च्या सुमारास घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कचरा वाहतूक करणारा ट्रक कचरा टाकण्यासाठी आला असता हा प्रकार निदर्शनास आला. हा कठडा कोसळत्या वेळी याठिकाणी काम करत असलेले कामगार हजर नसल्याने जीवितहानीचा प्रकार घडला नाही. मागचे 20 दिवस सोनसोडो (Sonsodo) येथील वीज यंत्रणा बंद असल्याने येथे कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंद झाल्याने येथे मोठ्या प्रमाणावर ओला कचरा साठून पडला होता. याच कचऱ्याच्या वजनाने ही भिंत कोसळल्याची माहिती आहे.
कचरा (Garbage) प्रक्रिया करण्यात येत असलेल्या या शेड मध्ये प्रक्रिया करून ठेवलेला कचरा साठविण्यात येत असतो. कठडा कोसळलेल्या ठिकाणी असाच कचरा साठविण्यात आला होता. तो अतिरिक्त प्रमाणात साठविण्यात आला असल्याने हा कठडा कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या कचरा यार्डवर मागील काही दिवसांपूर्वी आग लागून येथील कचरा प्रक्रिया करण्यात येत असलेलं बेलिंग मशीन, वीज ट्रान्सफॉर्मर तसेच इतर साहित्य मिळून एकंदरीत चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाले होते. अशातच कठडा कोसळल्याने नुकसानात आणखी भर पडणार आहे.
येथील कठडा कोसळल्याविषयी माहिती देताना मडगाव (Madgaon) नगरपालिकेचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी सांगितले की, या विषयी माहिती प्राप्त करण्यासाठी नगरपालिकेच्या अभियंत्यांना पाठविण्यात आले असून यानंतर कठडा कोसळण्याचे कारण आणि किती नुकसान झाले याची माहिती मिळणार आहे. नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनीही घटना स्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.