
फोंडा: विजेच्याबाबतीत आपल्याला स्वयंपूर्ण होण्यासाठी सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही, त्यामुळे प्रत्येकाने सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. बांदोडा येथील नंदनवन सभागृहात ‘जीईडीए‘ आणि ‘एनआरई‘ या वीज खात्याशी संबंधित विभागांतर्फे मोफत सौर ऊर्जा प्रकल्पासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित खास कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माधवराव ढवळीकर ट्रस्टचे विश्वस्त मिथिल ढवळीकर, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, बांदोडा सरपंच रामचंद्र नाईक, उपसरपंच चित्रा फडते इतर पंचसदस्य तसेच वीज खात्याचे कार्यकारी अभियंता सुदन कुंकळ्येकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहायक अभियंता महानंद शेट आणि जीईडीए व एनआरई खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
ढवळीकर म्हणाले, विजेच्या निर्मितीसाठी कोळशाची आवश्यकता असते, त्यामुळे प्रदूषणाचा मोठा धोका असतो. हा धोका दूर करण्यासाठी सौर ऊर्जेचा पुरस्कार करणे गरजेचे बनले आहे. सौर ऊर्जा योजनेचा लाभ घेतल्यानंतर ग्राहक आपली अतिरिक्त वीज सरकारला विकू शकतो, त्यातून फायदाच आहे, त्यामुळे भविष्यात विजेसंबंधी कोणत्याही समस्या उद्भवू नये, असे जर नागरिकांना वाटत असेल तर सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.
‘जीईडीए’च्या अधिकाऱ्यांनी सौरऊर्जा तसेच केंद्र व राज्य सरकारकडून सवलतीसंंबंधी माहिती दिली. उपस्थित नागरिकांना ‘पीएम सूर्यघर योजना’ तसेच मोफत सौर ऊर्जा योजनेसंबंधी कुतुहल दिसले. नागरिकांनी शंका निरसनासाठी अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न विचारले. मडकईचे अनंत नाईक यांनी सौर ऊर्जा पॅनलसंबंधी अनुभव सांगितला. मोफत वीज कशी मिळू शकते, काय करावे लागेल,ही माहिती दिली.
मडकई मतदारसंघात पीएम सूर्यघर योजना तसेच कुसुम व इतर योजनांंसंबंधी उपयुक्त माहिती देण्यात आली. या योजनेचा लाभ नागरिकांना घेता यावा, शंकांचे निरसनासाठी वीजमंत्री सुदिन ढवळीकर तसेच ढवळीकर ट्रस्टकडून या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मडकई मतदारसंघातील इतर पंचायतीतही हा कार्यक्रम झाला, त्याला नागरिकांचा प्रतिसाद लाभला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.